टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.२२ नोव्हेंबर २०२२ : अहमदनगरच्या स्नेहालय संस्थेच्या ध्येयवादी महिला संघटक सौ. सरीता भारत कुलकर्णी (वय ३८) आणि सचिन भीमराव काळे (वय ४०) यांचा आज (दि.२२) सकाळी ११ वाजता रस्ता अपघातात मृत्यू झाला.दौंडकडून नगरकडे जाणारी इंडिका कार अवजड ट्रकला ओव्हरटेक करत असताना समोरुन नगरकडून दुचाकीवरून सरीता भारत कुलकर्णी आणि सचिन भीमराव काळे श्रीगोंद्याकडे जात होते.
हे दोघे स्नेहालय संस्थेच्या स्नेहदीप रुग्णसेवा केंद्र या उपक्रमाचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी ते श्रीगोंदे भागातल्या काही डॉक्टरांना आपले रुग्णसेवेचे उपक्रम सांगण्यासाठी जात होते.त्यांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या इंडिका कारने चुकीच्या दिशेने जाऊन जोराची धडक दिली. त्यामुळे कुलकर्णी आणि काळे यांचा अपघाती मृत्यू झाला.दरम्यान, त्याचवेळी सुरेश साहेबराव कवडे आणि पोपट तात्या भाऊ साबळे हे दोघेही त्यांच्या मागून मोटसायकलवरून येत होते. कवडे आणि साबळे यांनादेखील याच कारने गंभीर इजा केली. कोळगाव (ता. श्रीगोंदे) येथील स्नेहालयचे कार्यकर्ते अमोल लगड आणि रस्त्याने जाणारे सामाजिक कार्यकर्ते घनश्याम अण्णा शेलार यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून या दोघांना नगरकडे रवाना केले. परंतू रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.रुग्णवाहिकेचा चालक पप्पू भागवत याने अक्षरश: १२० च्या वेगाने सदर रुग्णवाहिका नगरला आणली. मात्र नियतीला कदाचित कुलकर्णी आणि काळे यांचा मृत्यू अपेक्षित होता.
दरम्यान, कुलकर्णी आणि काळे यांच्या अकाली मृत्युमुळे अहमदनगरचा स्नेहालय संपूर्ण परिवार शोकसागरात बुडाला आहे.सरीता आणि भारत कुलकर्णी यांना गिरीश आणि शिरीष अशी २ महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुले आहेत. सचिन काळे यास २ भाऊ , पत्नी आणि मुलगा आणि मुलगी आहे.
यशवंत कुरापट्टी, दीपक बुरम, सचिन काळे, प्रविण मुत्याल ही स्नेहालय संस्थेच्या पहिल्या फळीतील विद्यार्थी आहेत.हे सर्व आज अखेर स्नेहालयसोबत कार्यरत आहेत. यातील सचिनचा दुवा निखळला. दरम्यान, आज (दि. २२) सायंकाळी ८ वाजता अहमदनगरमधील अमरधाम येथे या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती स्नेहालय परिवाराच्यावतीनं देण्यात आली.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा