टीम लोकक्रांती : लिंपणगाव प्रतिनिधी : दि.२८ नोव्हेंबर २०२२ : मढेवडगांव येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेतील १९७२ वर्षांमध्ये आठवीत असलेले विद्यार्थी तब्बल ४७ वर्षानंतर पुन्हा एकदा शाळेत भेटले. तब्बल ४७ वर्षांनंतर या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मैत्रीला पुन्हा उजाळा दिला. माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याला वेगवेगळ्या क्षेत्रात कामे करून सेवानिवृत्त झालेले, तसेच काही स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करणारी मित्र मंडळी एकत्र आली.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली त्यानंतर शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून विद्येची देवता सरस्वती व कर्मवीर अण्णांच्या प्रतिमांचे पूजन झाले त्यानंतर दिवंगत विद्यार्थी मित्र व शिक्षकांना श्रद्धांजली वाहताना सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना भरून आले.
एकमेकांशी हितगूज करताना शालेय जीवनातील आठवणींची पाने परस्परांच्या साथीने उलगडू लागली. तसतसे भूतकाळात शिरताना आणि वर्तमानाची त्याच्याशी सांगड घालताना सर्वांनाच अनोख्या दुनियेची सफर घडली.स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते. ‘प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता.
वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. या मेळाव्याला माजी शिक्षकांनाही आमंत्रित करण्यात आले होते. या शिक्षकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
माजी शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांची संवाद साधून आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. मध्यंतरीच्या काळामध्ये काही शिक्षक व विद्यार्थी मित्र स्वर्गवासी झाले हे ऐकून सर्वजण हळहळ व्यक्त करत होते. एकूणच प्रदीर्घ काळानंतरच्या पूर्ण भेटीमुळे सर्वांच्या चेहऱ्यावर अनोखा आनंद ओसंडून वाहत होता या कार्यक्रमाला २८ माजी विद्यार्थी व दोन विद्यार्थिनी उपस्थित होत्या.तसेच त्या वेळच्या शिक्षकवृंदा पैकी तीन शिक्षक सपत्नीक हजर होते.शिक्षकाचे औक्षण करून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाची जबाबदारी जिजाबापू शिंदे, बाळासाहेब काकडे, पोपट खोमणे, तुकाराम शिर्के, शिवाजी शिरसाठ, झुंबर हंडाळ,महादेव कदम,बाळासाहेब मांडे यांचेकडे देण्यात आली होती.
४७ वर्षानंतर झालेल्या पहिल्या स्नेहसंमेलनाने पुन्हा एकदा सर्व वर्ग मित्रांनी नव्याने ओळख करून घेतली. हा स्नेहपूर्ण मेळावा खूपच उत्साह आनंद व समाधान देऊन गेला हे मात्र नक्की हा आनंद पुन्हा पुन्हा मिळत राहण्यासाठी असे स्नेहसंमेलन प्रत्येक वर्षी आयोजित करण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले. स्नेहसंमेलनाचे स्वागत विद्यार्थी मित्र व पंचायत समितीचे विद्यमान सदस्य जिजाबापू शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन शिवाजी धावडे यांनी केले व प्रभाकर रसाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : नंदकुमार कुरुमकर)