टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.१२ डिसेंबर २०२२ : चालू गळीत हंगामात सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा ऊस दर तालुक्यात एक नंबर तर जिल्ह्यात इतर कारखान्यांच्या बरोबरीने राहणार असून कारखान्याने दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ अखेर गाळप केलेल्या एक लाख ७७ हजार ७६०.२०५ मेट्रिक टनाचे पहिले पेमेंट रुपये २३०० प्र.मे. टनाप्रमाणे ४०.८८ कोटी रुपयांचे पेमेंट सभासद शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करीत असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी दिली.
नागवडे कारखान्याचा गाळप हंगाम दिनांक २७ ऑक्टोबर २०२२ रोजी सुरू झाला असून दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ अखेर कारखान्याने १ लाख ७७ हजार ७६०.२०५ मॅट्रिक टन उसाचे गाळप केले असून सदर उसाचे पहिले पेमेंट सोमवार दिनांक १२. १२ . २०२२ रोजी रुपये २३०० प्र.मे.टनाप्रमाणे संबंधित सभासद शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येत आहे. कारखान्याने दिनांक १०.१२.२०२२ अखेर २ लाख ३७ हजार ३४० जमे..टन उसाचे गाळप केले असून त्यापासून रॉ शुगर १ लाख ८८ हजार ५५० क्विंटल तर पांढरी साखर १९१०० क्विंटल अशी एकूण दोन लाख सात हजार सहाशे पन्नास क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून सरासरी साखर उतारा ८.७७ एवढा मिळालेला आहे. तसेच कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प उत्तम प्रकारे चालू असून आज अखेर एक कोटी बारा लाख ८४ हजार ४८८ युनिट वीज वितरण कंपनीला वितरित करण्यात आले आहेत. चालू वर्षी ऊस तोड वाहतूक करणाऱ्या मजुरांची थोडी कमतरता निर्माण झालेली आहे. तरीही त्यावर मात करून नागवडे कारखान्याचा गाळप हंगाम यशस्वीरित्या चालू आहे.
चालू गळीत हंगामात नऊ लाख मेट्रिक टनाचे गाळपाचे उद्दिष्ट असून त्यादृष्टीने कारखाना संचालक मंडळ व प्रशासन प्रयत्नशील आहे. नागवडे कारखान्याने सातत्याने चांगला ऊस भाव दिलेला असून कारखाना ऊस भावाबाबत कधीही मागे राहिलेला नाही. शिवाय सर्व पेमेंट हे वेळचे वेळी दिलेले आहेत. चालू गळीत हंगामात नागवडे कारखान्याचा अंतिम ऊस भाव हा तालुक्यात एक नंबरचा व जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने राहणार आहे. तरी सभासद शेतकऱ्यांनी ऊस गाळपासाठी फार घाई न करता नागवडे कारखान्यास ऊस देऊन जास्तीत जास्त गाळप करण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी केले आहे.
स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांच्या प्रेरणेने व विचाराने नागवडे कारखान्याचा कारभार काटकसरीचा व सभासदांच्या हिताचा करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असून सभासद शेतकऱ्यांना इतर कारखान्यांच्या तुलनेत निश्चितच चांगला ऊस भाव व इतर सुविधा दिलेल्या आहेत. भविष्यातही तोच विचार व तीच प्रेरणा घेऊन स्वर्गीय बापूंना अभिप्रेत असेच काम करणार असल्याने सभासद शेतकऱ्यांनी कारखान्यास सहकार्य करावे असे आवाहन राजेंद्र दादा नागवडे यांनी केले आहे.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा