टीम लोकक्रांती : कोळगाव प्रतिनिधी : दि.१६ डिसेंबर २०२२ : कोरेगाव, तालुका श्रीगोंदा येथील गोविंद बन कृषी पर्यटनास दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असून आता विदेशी पर्यटकांनीही भेट देण्यास सुरुवात केली आहे. जर्मन पर्यटकांनी नुकतीच या कृषी पर्यटनास भेट दिल्याने या कृषी पर्यटनाच्या कार्याची ओळख विदेशात पोहोचली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना गोविंद बन कृषी पर्यटन केंद्राचे संचालक बाळासाहेब मोहारे व दादासाहेब साबळे यांनी सांगितले की, जर्मन देशातील फ्रेडरिक ब्रुमार या विदेशी पर्यटकांना रोटरी क्लब दौंड चे अध्यक्ष डॉक्टर राजेश दाते, सचिव अमीर शेख, रोटेरियन महेश राजोपाध्ये, रोटरीन प्रज्ञा राजोपाध्ये व इतर पर्यटकांनी नुकतेच गोविंद बन कृषी पर्यटन केंद्रास भेट दिली. त्यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील हुरडा केंद्रातील हूरडा चटणीचा आनंद घेतला. बैलगाडी सफर केली. तसेच ताज्या पालेभाज्यांचा आस्वाद घेऊन समाधान व्यक्त केले.
- निसर्गरम्य वातावरणातील ग्रामीण भागातील गोविंद बन कृषी पर्यटन केंद्राच्या उभारणीमुळे या परिसरात उद्योगास चालना मिळाली असून नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केल्याने शेतीपूरक व्यवसाय हा वाढीस लागला आहे. अशाच उद्योगामुळे ग्रामीण भागाचा कायपलट होण्यास मदत होईल अशी भावना जर्मन पर्यटक फ्रेडरिक ब्रुमार यांनी व्यक्त केली व पर्यटन केंद्रास शुभेच्छा दिल्या. या सर्वांनी कृषी पर्यटन केंद्राचा आनंद लुटला.
यावेळी जर्मन पर्यटक व इतरांचा या केंद्राचे संचालक बाळासाहेब मोहारे व दादासाहेब साबळे तसेच ग्रामस्थांनी सत्कार केला. याप्रसंगी बाळासाहेब मोहारे म्हणाले की, या केंद्राच्या उभारणीमुळे ग्रामीण भागातील कृषी पर्यटनाला तसेच उद्योग धंद्याला चालना मिळाली असून अहमदनगर, दौंड, पुणे या परिसरातून पर्यटक दरवर्षी या केंद्रास भेट देत असतात. आता मोठ्या प्रमाणावर शालेय सहलींचेही नियोजन या ठिकाणी करण्यात येत असून नगर मधील सहलींचे बुकिंग झाले आहे. परिसरातील शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी कमी फी आकारून त्यांना या कृषी पर्यटन केंद्राचा आनंद घेण्यासाठी विशेष सवलत देण्यात आली आहे. या गोविंदबन कृषी पर्यटन केंद्रात सुरती हुरडा, चुलीवरचे जेवण, हुलग्याचे शेंगोळे, पुरणपोळी, खपली गावाची लापशी, विविध प्रकारच्या चटण्या मुलांसाठी रेन डान्स, घोडा सफर, बैलगाडी सफर, घसरगुंडी, जम्पिंग हॉलीबॉल, विटी दांडू, क्रिकेट, फुटबॉल, धनुष्यबाण, रस्सीखेच अशा विविध ग्रामीण खेळांचे आयोजन येथे केले जाते. जर्मन पर्यटक ब्रुमार यांच्या भेटीमुळे हे कृषी पर्यटन केंद्र निश्चितच लवकरात नावारूपाला येईल असा विश्वास बाळासाहेब मोहारे यांनी व्यक्त केला आहे. आभार प्रदर्शन दादासाहेब साबळे यांनी केले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा