टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.२६ जानेवारी २०२३ : भारतातील लोकशाही ही जगातील सर्वात मोठी व आदर्श लोकशाही आहे . मतदार हाच या देशाचा मालक आहे, तोच ठरवतो या देशावर कोणी राज्य करावे, परंतु आज मतदारांना जागृत करणे खूप गरजेचे आहे. कारण समाजाचे हित आणि राष्ट्राचा विकास साधणारे लोकप्रतिनिधी तेव्हाच निवडून जातील, जेव्हा सर्व मतदार जागृतपणे मतदान करून पात्र लोकप्रतिनिधी निवडतील, असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे प्रा.डॉ.राम ढगे यांनी केले.
येथील रयत शिक्षण संस्थेचे, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त’ आयोजित केलेल्या व्याख्याना प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.महादेव जरें होते. यावेळी मराठी विभागप्रमुख प्रा.अनंत सोनवणे उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. जरे यांनी सर्वांना मतदारदिनानिमित्त शुभेच्छा देत, लोकशाही बळकटीसाठी मतदार जागृती गरजेची असल्याचे मत व्यक्त केले.
राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.अंबादास गोरे यांनी प्रास्ताविक केले.यावेळी कर्मवीर प्रतिमेस अभिवादन करून व सामूहिक प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमास प्रारंभ झाला. सूत्रसंचालन कु. आस्मा पठाण हिने केले, तर शेवटी प्रा.मीना लबडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
लोकक्रांती वृत्तांकन