टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.१३ फेब्रुवारी २०२३ : रविवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराचे अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या मार्गर्शनाखाली व संवर्धन प्रमुख संकेत नलगे, संकेत लगड यांच्या नियोजनात ४९ वी प्लॅस्टिक स्वच्छता मोहीम राजधानी किल्ले रायगड येथे पार पडली. यामध्ये ९५ सदस्यांनी सहभाग नोंदवला.
किल्ले बहाद्दूरगड (धर्मवीरगड) श्रीगोंदा येथील उगमस्थान असलेली परंतु महाराष्ट्रातील सहाद्रीच्या गडकोटांची माहितीपूर्ण अभ्यास मोहिम, गडकिल्ले संवर्धन, बारव जतन व ऐतिहासिक वारसा, संस्कृती जतन करणाऱ्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या वतीने प्लॅस्टिकमुक्त रायगडसाठी दरवर्षी शिवजयंती पूर्व शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन हा उपक्रम राबवत आहे. यावर्षी हे सहावे वर्ष होते.
गडावरील होळीचा माळ, हत्ती तलाव, महादरवाजा, व चढाई मार्गावरील पर्यटकांनी टाकलेला प्लॅस्टिक कचरा गोण्यामध्ये गोळा करून गडाखाली आणण्यात आला. चितदरवाजा येथे महाड येथील प्लॅस्टिक संकलित करणाऱ्या व्यक्तींकडे सुपूर्द करण्यात आला. एकूण ११ गोणी प्लॅस्टिक कचरा संकलित करून गडाखाली आणला.
- आज गडावर प्लॅस्टिक कचरा आहे…
भविष्यात प्लॅस्टिक मध्ये गड पहावा लागू नये म्हणून हा प्लॅस्टिकमुक्त गडकिल्ले उपक्रम शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन प्रत्येक महिन्याला एक गडावर राबवत आहे. यावेळी ही ४९ वी प्लॅस्टिक कचरा स्वच्छ्ता मोहिम रायगडावर होती. अशी माहिती उपाध्यक्ष डॉ. चन्द्रशेखर कळमकर यांनी दिली.
यामध्ये शिवदुर्ग परिवारातील अजित दळवी, गणेश कुदांडे, तुषार चौधरी,भरत खोमणे, प्रणव गलांडे, अमोल बडे, विठ्ठल मासाळ, अनिल गडदे,कांतीलाल फडतरे, नितीश गायकवाड, तारा चांदगुडे, संगीता इंगळे, सुचित्रा दळवी, सुप्रिया कुदांडे या शिलेदार मावळ्यांसह , महिलारणरागिणी, बालमावळे, वयोवृद्ध, व अनेक गावांतील सदस्यांनी सहभाग नोंदवला. श्रीगोंदा, पुणे, लोणी व्यांकनाथ, घारगाव, कोळगाव, काष्टी,बेलवंडी बु. सांगावी दुमाला, शिंदोडी, चिंभळे, कौठा,कोरेगाव भिमा ता. शिरूर, उंडवडी सुपे ता. बारामती येथील सदस्यांनी उत्स्फर्तपणे सहभाग नोंदवला.
लोकक्रांती वृत्तांकन