टीम लोकक्रांती
लिंपणगाव प्रतिनिधी | दि.१७ फेब्रुवारी २०२३ : श्रीगोंदा तालुक्यातील धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लिंपणगाव येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचा यात्रा उत्सव महाशिवरात्री पासून प्रारंभ होत आहे. यावेळी गावात तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून गावच्या यात्रा कमिटीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटीच्या प्रमुखां कडून देण्यात आली आहे. दरम्यान यात्रा कमिटीने दिलेल्या माहितीनुसार प्रथम महाशिवरात्री दिवशी पंचक्रोशीसह तालुक्यातील अनेक भक्त श्री सिद्धेश्वर महाराजांना पहाटेपासूनच महाअभिषेक घालून नतमस्तक होतात. महाशिवरात्रीच्या सायंकाळी ९ ते ११ जेष्ठ कीर्तनकार सुसेन महाराज नाईकवाडे बीड यांचे शिवरात्री महोत्सवावर हरिकीर्तन होणार आहे.
प्रामुख्याने यात्रेचा दुसरा दिवस हा यात्रेचा मुख्य दिवस समजला जातो. या दिवशी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला दंडवत घेऊन सकाळी सात वाजलेपासून श्री सिद्धेश्वर महाराजांना वाजत गाजत शेरनी वाटप करतात. दरम्यान त्याच रात्री आठ ते अकरा या वेळेत ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचा मांडगे महाराज यांच्या अधिपत्याखाली पंचक्रोशीतील भजनी मंडळाच्या टाळ मृदंगाच्या गजरात गावातून वाजत गाजत मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. सोहळ्या दरम्यान शोभेचे दारू काम हे डोळ्याचे पारणे फेडावे असे असणार आहे. पालखीचे मंदिरात विसर्जन झाल्यानंतर सविता राणी पुणेकर यांचा बहुरंगी लोकनाट्याचा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे.
यात्रेच्या तिसऱ्या दिवशी २० फेब्रुवारीला पुन्हा सविताराणी पुणेकर यांचा लोकनाट्याचा हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी मल्लांसाठी जंगी कुस्त्यांचा आखाडा भरणार आहे. तर त्याचं रात्री आठ ते साडेअकरा या दरम्यान मंगला बनसोडे सह नितीन बनसोडे यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होणार आहे. यात्रा सुरक्षित व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे. या यात्रेच्या तीन दिवशी कार्यक्रम प्रसंगी गावचे सरपंच, उपसरपंच हे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहणार असून, यात्रा कमिटीचे अन्य कार्यकर्ते हे सदस्य म्हणून कामकाज पाहणार आहे. भाविक भक्तांना श्री सिद्धेश्वराची विधिवत पूजा करण्यासाठी ज्येष्ठविधीतज्ञ सुधीर कुलकर्णी व मंदिराचे पुजारी शिवप्रसाद गुरव हे प्रयत्नशील आहे. तालुक्यातील भाविक भक्तांनी या ग्रामदैवताच्या उत्सवाचा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी कडून करण्यात आले आहे.
लोकक्रांती वृत्तांकन