टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.१९ फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्र बारव मोहिम अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव गलांडे येथील चालुक्य कालीन बारव महाशिवरात्रीला पाच हजार दिव्यांनी उजळून निघाली.
शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराचे वतीने महाराष्ट्र बारव मोहिम अंतर्गत चार बारवेवरती दिपोत्सव साजरा करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील ३ व पुणे जिल्हयातील १ बारव सजविण्यात आलेल्या आहेत.
महाराष्ट्र बारव मोहिमेचे रोहन काळे यांच्या विचारांना साथ देण्यासाठी, दुष्काळात हमखास जिवंत पाण्याचा स्रोत असलेल्या, आणि आपल्या पूर्वजांनी मोठ्या कष्टाने बांधलेल्या बारव जतन करण्यासाठी हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो.
देऊळगाव गलांडे,बेलवंडी कोठार ,कोसेगव्हाण ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर, सुपे ता. बारामती जिल्हा पुणे. येथील बारववरती मनोहरी नयनरम्य दिपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
शिवदुर्ग परिवाराच्या, आणि जगदंब युवा प्रतिष्ठानच्या वतीने देऊळगाव गलांडे येथे मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. कर्जत उपविभागीय पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व बारव जलपुजन करण्यात आले.
- केदारेश्वर नामकरण!
देऊळगाव गलांडे येथील बारव मधील पुरातन महादेव मंदिर आहे. सर्व जनसमुदायाच्या उपस्थितीत कर्जत उपविभागीय पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी “केदारेश्वर महादेव” असे नामकरण केले. या बरवची, गावाची हिमालया इतकी गौरवशाली उंची वाढवावी असे उदगार अण्णासाहेब जाधव यांनी काढले.
देऊळगाव गलांडे येथील बारव चालुक्य कालीन असून श्रीगोंदे तालुक्यातील मोठा ऐतिहासिक वारसा आहे. आपला ऐतिहासिक वारसा आपण जतन करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे.दररोज नजरे समोर असूनही नाजरेआड गेलेला वारसा (बारव)पुन्हा दिपोत्सवाने उजळून निघाला. युवापिढी हा वारसा जतन करण्यासाठी सरसावली आहे.ही खूप अभिमानाची बाब आहे असे गौरवोद्गार अण्णासाहेब जाधव यांनी काढले.
शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनची बारव संवर्धन टीम, श्रीगोंदा,काष्टी, कोळगाव, घारगाव, बेलवंडी बुद्रुक, गार, येळपणे, येथील मावळ्यांची उपस्थिती होती. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
देऊळगाव येथील जगदंब युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी बारव स्वच्छतेसाठी व दिपोत्सवसाठी मोठं योगदान दिले.देऊळगावचे सरपंच आणि मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच शरद गलांडे यांनी सर्वांचे स्वागत केले.प्रास्ताविक डॉ. चंद्रशेखर कळमकर यांनी केले. राहूल नवले यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन मारूती वागस्कर सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी व्यक्त केले.
यावेळी पत्रकार व त्याचबरोबर स्थानीक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन