टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.२० फेब्रुवारी २०२३ : रविवार दि.१९ फेब्रुवारी रोजी श्रीगोंदा शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात व भगव्यामय वातावरणात साजरी झाली. श्रीगोंदा शहरातील जोधपुर मारुती चौक या ठिकाणी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचे डेकोरेशन उभारन्यात आले होते. तसेच छत्रपती बहुउद्देशीय प्रतिष्ठान, जिजाऊ ब्रिगेड श्रीगोंदा, काळकाई चौक मित्र मंडळ, श्री स्वयंभू युवा प्रतिष्ठान, छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती या आयोजकांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
श्रीगोंदा शहरांमध्ये छत्रपती शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये शिवशाही राजेंद्र कांबळे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम शाहिरी जलसा, छत्रपती मॅरेथॉन स्पर्धा, भव्य रांगोळी स्पर्धा, छत्रपती बाईक रॅली महिला, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले दीपोत्सव व अभिवादन, शिवप्रतिमा पूजन, पालखी मिरवणूक, रक्तदान शिबीर, पालखी सांगता, शिव व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम, पारितोषिक वितरण, लेझर शो आशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन दिनांक १५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान उत्कृष्ट आणि शांततेत पार पडले. या सर्व स्पर्धांमध्ये स्पर्धकांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना मावळा या एकाच छत्राखाली आणले या मावळ्यांना एकत्र करून एकता, समता, बंधुता आणि न्यायप्रविष्ट स्वराज्याची स्थापन केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य,निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले. जे आजही पराक्रमी इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. शिवाजी महाराजांनी गनिमी कावा व दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले. परकीयांची जुलमी राजवट मोडीत काढत रयतेला आपलं वाटावं असं रयतेचे लोककल्याणकारी राज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केले त्यामुळे शिवरायांसाठी हसत हसत मरायलाही लोक तयार होत असत. या जगात अनेक राजे होऊन गेले परंतु फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत ज्यांची जयंती इतक्या उत्साहात आणि जल्लोषात आजही साजरी होते. शिवरायांच्या विचारांची ताकत एव्हडी आहे की आज ३९३ वर्षांनंतर ही मोठ्या उत्साहात आणि दिमाखात शिवजयंती साजरी केली जाते आणि पुढेही केली जाईल.
लोकक्रांती वृत्तांकन