टीम लोकक्रांती
लिंपणगाव, श्रीगोंदा | दि.२१ फेब्रुवारी २०२३ : विद्यार्थ्यांनी अभ्यासात जिद्द, चिकाटी अंगी बाळगावी निश्चितच यशाचे शिखर गाठता येते ,असे प्रतिपादन प्राचार्य दत्तात्रय सस्ते यांनी आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या एसएससी २०२२-२३ या बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी प्राचार्य दत्तात्रय सस्ते होते प्रमुख पाहुणे म्हणून नागवडे कारखान्याचे माजी संचालक विलासराव काकडे हे होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य सस्ते पुढे म्हणाले की, निरोप म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संमिश्र भावना असतात. सहा वर्ष माध्यमिक शिक्षण विद्यालयात घेत असताना शिक्षक व विद्यार्थ्यांचे निरोप घेताना विचारमंथन होणे गरजेचे आहे. जीवन जगत असताना आपणाकडे नम्रता असणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये शालेय जीवनात शिक्षण घेत असताना आई, वडील, व गुरुजनांचा विसर होता कामा नये. आई-वडिलांप्रमाणेच शिक्षक देखील मायेचे शिक्षण देत असताना संस्काराचेही धडे पुरेपूर मिळतात. त्यातून जीवन कसे जगायचे यासाठी दिशा मिळते.
एसएससी परीक्षेत प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्याला पाच हजार, दुसरा क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्याला तीन हजार आणि तिसरा क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याला दोन हजाराचे बक्षीस प्राचार्य सस्ते यांनी घोषित करून एसएससी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी गुणवंत, यशवंत, किर्तीवंत व्हावेत ,अशा शुभेच्छा प्राचार्य सस्ते यांनी यावेळी दिल्या.
ज्येष्ठ व्याख्याते अभिषेक उदमले यावेळी म्हणाले की, अभ्यासात सातत्य ठेवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील आठवणी सांगताना ते म्हणाले की, डॉ आंबेडकर यांची घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असताना त्यांनी परदेशात शिक्षण घेऊन देशाची राज्यघटना लिहिली. केवळ बुद्धीच्या व ज्ञानाच्या जोरावर त्यांनी भरीव ज्ञान मिळवले. त्यांच्या संपूर्ण विचाराच्या घटनेवर देश वाटचाल करत आहे. विद्यार्थ्यांनी देखील डॉ आंबेडकर यांचे विचार व आदर्श घेऊन घटनातज्ञ व्हावे अशी आशा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
उपशिक्षक तुषार नागवडे यावेळी म्हणाले की, शिक्षणाबरोबर संस्कार महत्त्वाचे आहेत. आई-वडील व शिक्षकांची विद्यार्थ्यांनी फसवणूक करू नये. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना शिक्षा मिळते परंतु त्यामागे शिक्षकाचा स्वच्छ व सकारात्मक हेतू असतो. असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक संजय दळवी, शिवाजीराव इथापे, संभाजी इथापे, आनंदा पुराणे, संतोष शिंदे आदींसह विद्यार्थी व विद्यार्थिनींनी यावेळी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत मनमोकळेपणाने एकमेकांशी भावना व्यक्त होऊन भाषणाद्वारे संवाद साधला. यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सिद्धी काकडे या विद्यार्थिनीने केले तर आभार कुमारी हर्षदा मगर या विद्यार्थिनीने मानले.
लोकक्रांती वृत्तांकन