टीम लोकक्रांती
श्रीगोंदा शहर | दि.२२ फेब्रुवारी २०२३ :
श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे यांना नुकतेच राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन व साहित्य सेवा कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पहिले ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. मराठी भाषा अध्यापन व साहित्य सेवा कार्यगौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे यांनी केलेले मराठी भाषा अध्यापन व साहित्य सेवा कार्य विचारात घेऊन त्यांना ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद सबनीस व आमदार लहूजी कानडे, साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष वंदनाताई मुरकुटे यांच्या हस्ते राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी गीतकार बाबासाहेब सौदागर, आयोजक अर्जून राऊत ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभान, श्रीरामपूर व इतर मान्यवर उपस्थित होते.
उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे यांना मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन आमदार बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, माजी आ.राहुल जगताप, महावीर पटवा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी कौतुक केले. तसेच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
लोकक्रांती वृत्तांकन