टीम लोकक्रांती
कोळगाव, श्रीगोंदा | दि.२८ फेब्रुवारी २०२३ :
कोळगाव परिसरात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. यंदा पावसाचे प्रमाण व्यवस्थित असल्याने शेतकऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु हाती मात्र नाम मात्र पैसा आल्याने शेतकऱ्यांच्या पोटी घोर निराशा आली. योग्य बाजारभाव न मिळाल्याने यावर्षी कांद्याच्या उत्पादनातून शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागले नाही अशीच परिस्थिती सर्वत्र दिसून येत आहे.
- सुरुवातीला वीस रुपये प्रति किलो असणारा कांद्याचा बाजारभाव आजमीतीस ७ रुपयापर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी नेणे ही परवडत नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेता कांद्याला हमीभाव सरकारने ठरवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कोळगाव परिसरात कोथुळ, ढोरजा, भानगाव, चिखली, कोरेगाव, सुरेगाव, उक्कलगाव, मुंगुसगाव या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कांद्याची लागवड केली होती. सुरुवातीस पैसे खर्च करून महागडे बियाणे खरेदी केली. खते, औषधे यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला. मजूरांचे भाव वाढल्याने मजूर मिळेनासे झाले. मिळेल तेथून मजुरांच्या टोळ्या उपलब्ध केल्या. निंदणी, खुरपणी, कांदा काढणे व कांदा भरणे यासाठी मोठा खर्च केला. ४०-५० रुपयांची कांद्याची गोणी खरेदी केली. वाहतुकीचा खर्च प्रत्येक गोणी पाठीमागे ४० ते ५० रुपये होतो. सर्व खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात मात्र काहीच शिल्लक राहत नाही.
उत्पादन खर्चाचा विचार करता व वेळ, पैसा, मजुरी, नांगरट पासून कांदा बाजार मार्केटमध्ये नेण्यापर्यंत खर्च लक्षात घेता अगदी कमी प्रमाणात कांद्याला बाजार भाव मिळाल्याने निराशा उत्पन्न झाली. आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार करता कांद्याचे निर्यात कमी झाली असून अफगाणिस्तान, बांगलादेश व पाकिस्तान येथून कांदा खरेदी जवळ जवळ थांबली आहे. त्यामुळे कांदा निर्यात कमी प्रमाणात होत आहे त्याचाही परिणाम कांद्याच्या बाजारभाव झाल्याचे समजते.
लोकक्रांती वृत्तांकन