टीम लोकक्रांती
–किशोर मचे–
श्रीगोंदा शहर | दि २ मार्च २०२३ :
श्रीगोंद्याचे ग्राम दैवत श्री संत शेख महंमद महाराज यांची यात्रा शुक्रवारी दिनांक ३ मार्च २०२३ रोजी होत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम ऐैैक्याचे प्रतीक असणारे दैवत म्हणून श्री संत शेख महंमद महाराज यांचा मोठा नावलौकिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांनी त्यांना गुरू मानले होते. त्यामुळे या ऐतिहासिक भूमीला महत्त्व आहे दरवर्षी भरणाऱ्या या यात्रा उत्सवाचे आकर्षण हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असते.यात्रेत हिंदू मुस्लिम भाविक भक्त बहुसंख्येने हजेरी लावतात.
यात्रेच्या दिवशी सकाळपासूनच भक्तिमय वातावरणात डीजेच्या संगीतामध्ये वाजत गाजत शेरनी घेऊन भाविक भक्त बाबांच्या समाधीवर चादर चढवण्यासाठी येत असतात. मनोभावे सर्व भाविक दर्शन घेतात काही नवसपूर्ती करतात तर काही नवस करून काही मनोकामना माघत असतात. दर्शनासाठी सकाळपासूनच मोठी भाविकांची गर्दी असते.
विशेष करून या यात्रेमध्ये येणारे मोठमोठे पाळणे या यात्रेचे खास वैशिष्ट्य आहे त्याचा सर्वच जण मनमुराद आनंद लुटतात तसेच विविध मनोरंजनाचे कार्यक्रम लहान मुलांची खेळणी दुकाने यात्रेत पाहण्यास मिळतात.
दरवर्षी भव्य कृषी प्रदर्शन यात्रे निमित्त भरवले जाते. तसेच महिला वर्ग ही मोठ्या प्रमाणात गृहपयोगी वस्तूंची खरेदी या यात्रेमध्ये करत असतात. या यात्रेनिमित्त प्रत्येक कुटुंबात उत्साहाचे वातावरण असते प्रत्येक घरात पाहुणे रावळे यांची रेल चेल असते.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी श्री संत शेख मोहम्मद महाराज देवस्थान यात्रा उत्सव कमिटीने कुस्त्यांचा जंगी निकाली आखाड्याचे दरवर्षी प्रमाणे मोठ्या स्वरूपात आयोजन केलेले असते, यावर्षी ही शनिवार दिनांक ४ मार्च रोजी श्री संत शेख महंमद महाराज मंदिर पटांगणामध्ये कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन केलेले आहे.
कुस्तीचे पहिले बक्षीस तीन लाख एक हजार दुसरे बक्षीस दोन लाख एक्कावन हजार तर तिसरे बक्षीस दोन लाख एक हजार आशा स्वरूपाचे आहेत. लाखों रुपयांचा इनामी कुस्त्यांचा जंगी आखाड्या मध्ये नामवंत मल्ल कुस्ती मैदानात एकमेकांना भिडणार हे पाहण्यासाठी कुस्ती प्रेमींसाठी ही एक पर्वणीच ठरते.एखादी कुस्ती आवडलीच तर प्रतिष्ठित नागरिक नेतेमंडळी ही बक्षिसांची उधळण करत असतात. मोठमोठ्या मल्लांच्या कुस्त्या आणि लाखो रुपयांचे बक्षिसे असे या आखाड्याचे प्रमुख आकर्षण असते.
तसेच उत्कृष्ट लोकनाट्य तमाशाचे यात्रेनिमित्त आयोजन केले जाते. श्रीगोंदा तालुका व शेजारील तालुक्यातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात या यंत्रे साठी येत असतात. अशा प्रकारे खूप मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरण यात्रा पार पडते.
लोकक्रांती वृत्तांकन