टीम लोकक्रांती : २८ ऑगस्ट २०२२ : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत शासनाने जाहीर केलेल्या प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान देण्यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने कार्यवाही सुरू केली आहे या योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा बँकेचे १ लाख १४ हजार ३२१ शेतकरी तर औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा बँकेचे ७५ हजार तर राष्ट्रीयकृत बँकेचे १ लाख शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता असून त्यांना जवळपास ५५० कोटी रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता आहे.
३१ ऑगस्टपर्यंत सर्व याद्यांचे ऑडिट होऊन १० सप्टेंबरपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ही रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांनो, कर्जखात्याला आधार लिंक करणं गरजेचं….
शेतकऱ्यांनो लिंकींगसाठी फक्त २ चं दिवस उरले असून लवकरात लवकर आपल्या बँक मॅनेजरशी / किंवा ए टी एम च्या माध्यमातून ऑनलाईन लिंक करून घ्या. अन्यथा पात्र असूनही तुम्हाला यादीतून वगळलं जाऊ शकतं.
या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचे कर्जखाते ५ सप्टेंबरपूर्वी मोबाइल आणि आधारशी लिंक करावे लागणार आहे. लिंक नसलेल्या खात्यांची माहिती ५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. मोबाइल आणि आधार लिंक असलेल्या शेतकऱ्यांच्याच खात्यावर १० सप्टेंबर रोजी प्रोत्साहन रक्कम टाकली जाणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ मोबाइल क्रमांक आणि आधारकार्ड लिंक करून घ्यावेत तसेच बचत खाते क्रमांक, मोबाइल क्रमांक यांची माहिती विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, बँकेत द्यावी, असे आवाहनही राज्यातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आलं आहे
कोणाला आणि कसा मिळणार हा ५०,००० रु. प्रोत्साहनपर लाभ….सन २०१७-१८ ते २०१९-२०या३ वर्षात घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीककर्जाच्या परतफेडीच्या देय दिनांकास अथवा ३६५ दिवस विचारात घेऊन पीककर्जाची मुद्दल व व्याजासह पूर्णतः परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्दल रकमेवर ५० हजारांपर्यंतचा प्रोत्साहनपर रकमेचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने २९ जुलै रोजी जाहीर केला होता. हा लाभ देताना वैयक्तिक शेतकरी हा निकष विचारात घेण्यात येत आहे.
एक किंवा अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीककर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन बँकांनी प्रोत्साहनपर लाभाची रक्कम निश्चित करावयाची आहे. असे करताना ३ वर्षापैकी एक वर्षात कर्ज घेऊन त्याची विहित मुदतीत मुद्दल व व्याजासह पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांची माहिती विविध कार्यकारी संस्था किंवा बँकांनी भरावयीच आहे.
तसेच ३ वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षामध्ये घेतलेल्या पीककर्जाची पूर्णतः परतफेड केली असल्यास अशा शेतकऱ्यांचीही माहिती मागविण्यात आली आहे. २०१९ मध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा लाभ मिळाला आहे, असे शेतकरी देखील या योजनेस पात्र राहणार आहेत.
या योजनेसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास १ लाख ७५ हजार शेतकरी पात्र ठरू शकणार आहेत. यात ७५हजार शेतकरी हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तर उर्वरित १ लाख शेतकरी विविध राष्ट्रीयकृत बँकेचे आहेत. या शेतकऱ्यांना जवळपास ३०० कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता आहे.
३१ ऑगस्टपर्यंत सर्व बँका, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांना याबाबतची माहिती गोळा करायची आहे. या योजनेसाठी राज्यात जवळपास १४ लाख शेतकरी पात्र ठरणार असून ४७०० कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे.
स्त्रोत – ऑनलाइन इन्फॉर्मेशन