टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.१७ मार्च २०२३ :
पुरुषाने स्त्रीप्रमाणे कुटुंब, कुटुंबातील सदस्य व कौटुंबिक हित साधून जिव्हाळा, आपुलकी, प्रेमाचे नाते निर्माण करून सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी पुढे यावे ‘असे प्रतिपादन महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी केले. ते श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय व विद्यार्थिनी विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धा उद्घाटन प्रसंगी बोलत होते. त्यांनी पुढे सांगितले की, पुरुषांचे जगणे हे स्वतःसाठी असते परंतु महिला कुटुंबासाठी, कुटुंबाच्या हितासाठी जगते. तिने नेहमीच आपल्या आरोग्याकडे दूर्लक्ष केले. महिलांनी आपले शारीरिक,मानसिक,बौद्धिक आरोग्य रक्षण करून सामाजिक समतेसाठी पुरुषास साथ द्यावी.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थिनी विकास मंचच्या प्रमुख डॉ. सुप्रिया पवार यांनी केले व आभार डॉ. अनुराधा ताटे यांनी मानले. याप्रसंगी महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालया मार्फत महिलांच्या शारीरिक सामाजिक जडणघडणीसाठी तीन दिवस विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयातील विद्यार्थिनी, महिला शिक्षिका, महिला पालक, यांनी धावणे, चालणे, गोळा फेक, खो खो, कुस्ती, योगा व सायकलिंग, या खेळ प्रकारांमध्ये उस्फूर्त सहभाग घेतला. सदर स्पर्धांच्या नियोजनात प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, डॉ. सुप्रिया पवार, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संजय अहिवळे, शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. कल्पना बागूल, प्रा. संजय डफळ, प्रा. संतोष जाधव, उपप्राचार्य डॉ.महादेव जरे, डॉ. प्रकाश साळवे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थिनी, महिला पालक व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते .
लोकक्रांती वृत्तांकन