टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.२२ मार्च २०२३ :
श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला येथील मागच्या आठवड्यात घडलेल्या दरोडा आणि खून प्रकरणी तपासात अहमदनगर पोलिसांना यश. दरोडा, खून,जबरी चोरी, व इतर गंभीर गुन्ह्यातील फरार असलेल्या चार सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की,श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला येथील दिवटे वस्तीवरील कल्याण मच्छिंद्र गायकवाड यांच्या घरी दि.१३ मार्च रोजी सशस्त्र दरोडा टाकला. गायकवाड यांच्या घरातील महिलांच्या अंगावरील दागिने चोरून नेत असतांना चोरट्यांना प्रतिकार करणाऱ्या कल्याण मच्छिंद्र गायकवाड यांच्यावर धारदार शास्त्राने वार करून चोरटे पळून गेले होते. या चोरट्यांच्या मारहाणीत कल्याण मच्छिंद्र गायकवाड या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता.
शर्मिला कल्याण गायकवाड यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भादविक ३०२, ३९४ प्रमाणे जबरी चोरी आणि खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
या घटनेचे पडसाद श्रीगोंदा तालुक्यात उमटले होते अरणगाव दुमाला येथील ग्रामस्थांनी बेलवंडी पोलिस स्टेशनसमोर ठिय्या मांडून आंदोलन करून आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती.
पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली असता या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी निमकर काळे रांजणगांव मशिद, ता. पारनेर हा त्याच्या इतर तीन साथीदारांसह तळेगांव दाभाडे येथील जुना टोलनाका येथे असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी झाडा झुडपात पळून जात असताना पाठलाग करून मोठ्या शिताफीने पकडले.
निमकर अर्जुन काळे,वय २१,रा.रांजणगांव मशिद,ता. पारनेर,शेखर उदास भोसले, वय २०, रा. कोळगांव, ता. श्रीगोंदा,अतुल उदास भोसले,वय १९, रा. कोळगांव, ता. श्रीगोंदा व एक विधीसंघर्षीत बालक अशी आरोपींची नावे आहेत. या चारही आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.
लोकक्रांती वृत्तांकन