टीम लोकक्रांती
कोळगाव, श्रीगोंदा | दि.३१ मार्च २०२३ :
श्रीगोंदा तालुक्यातील वीज, रस्ता आणि पाण्याचा प्रश्न केवळ आमदाराच्या नाकर्तेपणामुळे सुटला नसून साकळाईचा प्रश्न म्हणजे येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी हाती घेतलेला चुनावी जुमला असल्याचे प्रतिपादन कोळगाव येथे झालेल्या परिवर्तन संवाद यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी केले. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक एम एस लगड होते.
श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील विकासाचे प्रलंबित प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यासाठी घनश्याम शेलार यांनी कोळगाव व परिसरातील वाड्यामस्त्यांवर जाऊन तेथील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यानिमित्ताने सायंकाळी कोळगाव येथे झालेल्या सभेत घनश्याम शेलार हे पुढे म्हणाले की, खासदार व तालुक्याचे आमदार यांनी लोकांना खेळवत ठेवण्यासाठी साकळाईचा मुद्दा पुढे केला आहे. तालुक्यातील विजेचा प्रश्न अद्याप पर्यंत सुटलेला नाही. चाळीस वर्षापासूनचे रस्त्याचे प्रश्न आहे तसेच आहेत .शेतीला पुरेशा दाबाने वीज पुरवठा नसल्याने पाणीपुरवठा करता आलेला नाही. सब स्टेशनचे प्रश्न पूर्वीप्रमाणेच आहेत.
१९९२ साली साकळाईचा प्रश्न ज्या वेळेला मी हाती घेतला त्यावेळेला सर्वांनी मला वेड्यात काढले. राधाकृष्ण विखे पाटील व आमदार बबनराव पाचपुते यांनी तर ही योजना होऊ शकत नाही म्हणाले. परंतु त्यावेळेस विरोध करणारे तेच नेते साकळाई प्रश्नाचे भांडवल करून उपमुख्यमंत्र्यांचा नावावर दुष्काळी भागातील जनतेला झुलवत ठेवण्याचे काम करत आहेत. ज्यांनी साकळाईला विरोध केला तेच लोक आता सर्वेक्षणाच्या दोन कोटी मंजुरीच्या नावाखाली स्वतःचे सत्कार करून घेत आहेत.
परंतु मागील विधानसभेच्या काळात झालेली चूक यापुढील काळात होणार नाही. साडेतीन वर्षात लोकांच्या प्रत्येक सुखदुःखात व समस्या सोडवण्यात मी अजूनही सक्रिय आहे परंतु तालुक्याचे आमदार हे कुठल्याही प्रश्न सोडवताना दिसत नाही.आमच्यात बेकी असली तरी तुम्ही मात्र परत आमदार होणार नाही असा चिमटा पाचपुते यांना काढला.
शिवसेना शहरप्रमुख प्रवीण खेतमाळीस यांनी, मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीमध्ये शिवसेना हा घटक पक्ष नव्हता. त्यामुळे शिवसेनेची मते घनश्याम शेलार यांना मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांचा पराभव झाला. परंतु येणाऱ्या निवडणुकीत घनश्याम शेलार यांना कोळगाव परिसरामधून दुपटीने मताधिक्य देऊ असा विश्वास घनश्याम शेलार यांना दिला.
खेतमाळीस यांच्या छोट्या परंतु धडाकेबाज भाषणाने सर्वांची मने जिंकली. यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन दादासाहेब निरफळ, राष्ट्रवादी सामाजिक न्यायाचे गोरख घोडके, राष्ट्रवादी सेवा दलाचे तालुकाध्यक्ष श्याम जरे, प्राचार्य एम एस लगड यांनी आपली मनोगते मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावित श्रीगोंदा कारखान्याचे माजी संचालक हेमंत नलगे यांनी केले.
या सभेच्या वेळी नरेंद्र शिंदे, विनायक लगड, मोहन भिंताडे, प्रशांत शेलार, पद्माकर गाडेकर, जीवन लगड ,चिमणराव बाराहाते, नवनाथ काळे, लक्ष्मीकांत लगड, हनुशेठ लगड, मानसिंग लगड, संजू फिटर, सतीश पाटील लगड, राजू उजागरे, काळू उजागरे, संभाजी लगड, सुयश जाधव, गोरख घोंडगे व इतर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन