टिम लोकक्रांती
कोळगाव, श्रीगोंदा | दि.९ एप्रिल २०२३ :
कोळगाव यात्रेच्या निमित्ताने भरलेल्या कुस्ती आखाड्यात शेवटची मानाची कुस्ती डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. या कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी विष्णू खोसे व हरियाणा केसरी रॉनी कुमार यांच्यातील लढत चित्त थरारक ठरली. ५१ हजार रुपयांची ही मानाची कुस्ती विष्णू खोसे याने डोळ्याचे पाते लवकर हरियाणा केसरी रॉनी कुमार यास आसमान दाखवून चिटपट केले व कोळगावकरांनी एकच जल्लोष केला.
कोळगाव चा कुस्ती आखाडा अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात एकमेव उत्कृष्ट बांधकाम असलेला असून येथे अनेक पैलवानांनी मैदान गाजवले आहे. शेवटच्या तीन कुस्त्यांमध्ये रुपये पंचवीस हजार व २१ हजाराच्या दोन कुस्त्या सोनवणे वि .काळे, गायकवाड वि.काळे यांच्यामध्ये रंगल्या. या आखाड्यात एकूण लहान-मोठ्या १४७ कुस्त्या लावण्यात आल्या. एकूण चार लाख रुपये पैलवानांना वाटप करण्यात आले. तर चावडी वाटप, मानपान यासाठी एक लाख रुपये देण्यात आले.
या आखाड्यात पैलवानांची कुस्ती लावण्याचे काम नितीन लगड सरदार, पै.नारायण लगड तर पंच म्हणून पैलवान संजू मेहेत्रे, मोहन मेजर यांनी काम पाहिले. यावेळी अनेक जुने वस्ताद यांचा कोळगावकरांनी सन्मान केला. यावेळी श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, खासदार विखे यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर विखे, मिटूशेठ शिंदे, डॉक्टर चेडे, अविनाश गुंजाळ, श्रीगोंदा कारखान्याचे माजी संचालक हेमंत नलगे, माजी सभापती पुरुषोत्तम लगड,माजी उपसरपंच मधुकाका लगड, यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, कुकडी कारखान्याचे आजी माजी संचालक ,सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सर्व आजी माजी सोसायटी संचालक, गावातील सर्व प्रतिष्ठित, कोळगाव व परिसरातील कुस्तीप्रेमी बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन