टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.२७ एप्रिल २०२३ :
मंगळवार दि.२५ एप्रिल रोजी मांडवगण ग्रामपंचायत कारभाराविषयी दाखल केलेल्या तक्रारीचा चौकशी अहवाल न दिल्यामुळे व सरपंच यांचेवर कारवाई न केल्यामुळे मांडवगण येथील प्रल्हाद काशिनाथ लोखंडे व काही ग्रामपंचायत सदस्यांनी श्रीगोंदा पंचायत समिती समोर उपोषण केले.
तक्रारदार अर्जदाराने पंचायत समिती अधिकाऱ्यांना अर्जाद्वारे म्हटले आहे की वेळोवेळी मांडवगण ग्रामपंचायत मध्ये चाललेल्या भ्रष्टाचाराविषयी व चुकीच्या कामाविषयी वारंवार तक्रारी केलेल्या होत्या. तसेच आपणास स्मरणपत्र दिलेले होते. तरी आपण जाणिवपुर्वक कोणताही चौकशी केलेला अहवाल मला दिलेला नाही व कोणतीही कार्यवाही सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर केलेली नाही.
या चौकशी अहवालातील /अर्जातील मुद्दे खालीदिले आहेत
१. दि. ०४/०२/२०२३ रोजीचा अर्ज मौजे मांडवगण ग्रामपंचायत मध्य झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून सरपंच यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणेबाबत
२. दि. ०१/०२/२०२३ रोजीचा अर्ज – मौजे मांडवगण येथे मांडवगण फाटा ते घोडकेवस्ती रस्ता मजबुतीकरण करणे या नावाने सरपंच यांनी खोटी बिले काढल्यामुळे कामाची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करणेबाबत
३. सरपंच यांनी २ ऑक्टोबर २०२२ ची ग्रामसभा घेणे बंधनकारक असताना ग्रामसभा घेतलेली नाही. तसेच २६ जानेवारी २०२३ ची ग्रामसभा कोरम अभावी तहकुब झाली होती. ती तहकुब ग्रामसभा सरपंच यांनी अद्याप पर्यंत घेतलेली नाही. याविषयी मी आपणास तक्रारी अर्ज दाखल केलेला होता. परंतु त्यावर आपण आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. सदर अर्जानंतर
आपणास मी पुन्हा स्मरणपत्र दिलेले आहे.
४. मांडवगण ग्रामपंचायतने मौजे मांडवगण येथे वाडयावस्त्यावर जाण्यासाठी असलेले रस्ते मुरूमीकरण करणे हे काम न करता ६ लाखाची खोटी बिले काढल्यामुळे चौकशी करून संबंधीतावर फौजदारी गुन्हा दाखल करणेबाबत
५. सरपंच पती हा ग्रामपंचायत कारभारामध्ये जाणुनबुजुन हस्तक्षेप करत आहे व गावाला वेठीस धरण्याचे काम करीत आहे.
अशाप्रकारचे अहवाल दि १८ एप्रिल रोजी अर्ज सादर करत अर्जाची चौकशी होवुन सदर दोषींवर कारवाई न केल्यास दि. २५/०४/२०२३ रोजी पंचायत समिती कार्यलयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा या आधी दिला होता पंचायत समिती अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
श्रीगोंदा पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की अर्जामधील तक्रारीच्या मुददयाबाबत चौकशीसाठी संदर्भ क्रमांक २ च्या पत्रान्वये विस्तार अधिकारी (पं) यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे तसेच संदर्भ क्रमांक ४ च्या पत्रानुसार मांडवगण येथील मांडवगण फाटा ते घोडकेवस्ती रस्ता मजबुतीकरण या कामाच्या दर्जाबाबत अनुषंगीक चौकशी करून अहवाल सादर करणेबाबत उपअभियंता जि प /सां बा उपविभाग श्रीगोंदा व विस्तार अधिकारी (पं) यांना कळविण्यात आलेले आहे. सदर अहवाल प्राप्त होताच अहवालामध्ये दोषी आढळून येणा-यावर आवश्यक प्रशासकिय कार्यवाही पुढील १५ दिवसात करण्यात येईल असे आपणास आश्वस्त करण्यात येत आहे. तरी आपलेकडील संदर्भ क्रमांक १ च्या तक्रार अर्जाबाबत वरील प्रमाणे कार्यवाही करण्यात येत असल्याने संदर्भ क्रमांक ५ च्या आपल्या उपोषणाबाबत कळविण्यात येते की, आपण दिनांक २५ एप्रिल २०२३ रोजीच्या आमरण उपोषणापासुन परावृत्त व्हावे. दिलेल्या या पत्रा नंतर उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी मांडवगण ग्रामपंचायत सदस्य राधिका बापू घोडके,निशाबी अकबर काझी, चंदा प्रमोद लोखंडे, माजी जि.प.सदस्य अनिल ठवाळ, अनुराधा ठवाळ, संभाजी ब्रिगेडचे अमोल बोरुडे, संतोष शिंदे, हनुमंत जाधव, अशोक सुदाम घोडके, दाऊद अकबर काझी, अकबर हुसेन काझी, नवीन बदागरे, अमोल घोडके, सुदाम घोडके, योगेश जवळे हे उपोषणाला सहभागी होते.
लोकक्रांती वृत्तांकन