टीम लोकक्रांती
कोळगाव, श्रीगोंदा | दि.२९ एप्रिल २०२३ :
अत्यंत चुरशीने लढलेल्या श्रीगोंदा बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये राहुल जगताप गटाने नागवडे पाचपुते गटावर ११ विरुद्ध ०७ ने विजय मिळवला असून कोळगाव जिल्हा परिषद गटामधून जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे, सामाजिक कार्यकर्ते नितीन डूबल, चिखली ग्रामपंचायतचे माजी सरपंच व विद्यमान सोसायटी चेअरमन रामदास झेंडे सर यांची विजयी उमेदवार म्हणून निवड झाल्याने कोळगाव जिल्हा परिषद गटामध्ये सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व मतदार आनंद व्यक्त करत आहेत.
कोळगाव जिल्हा परिषद गटातून घारगावचे दत्तात्रय पानसरे व रामदास झेंडे सर हे नागवडे- पाचपुते गटातून विजयी ठरले आहेत. त्यांना अनुक्रमे १०४९ व ९६९ मते मिळाले आहेत. तर राहुल जगताप गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते व कोळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन शिवाजी डुबल यांना ९९४ मते मिळाल्याने विजयी झाले आहेत. या तिघांचेही समान वैशिष्ट्य म्हणजे नात्यागोत्यामध्ये जोपासलेले नातेसंबंध, सर्वपक्षीय कार्यकर्ते व मित्रमंडळी तसेच जनमानसात असलेली प्रतिमा यामुळे हे तिघेही निवडून आले आहेत.
तसेच तिघांचाही दांडगा जनसंपर्क असल्याने त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये त्यांना मिळाल्याचे चित्र दिसते आहे. या तिघांचे सर्वपक्षीय नेत्यांमध्ये संबंध असल्याने कोळगाव मधील नागवडे गटाचे प्रमुख नेते हे राहुल जगताप यांच्याशीही कायम संपर्कात असल्याने या निवडणुकीमध्ये दोन्ही गटांना साथ करत असल्याचे दिसून आले. कोळगाव परिसरात व देवदैठण पासून देऊळगाव पर्यंत कुकडी पट्ट्यातील मतदारांवर माजी आमदार राहुल जगताप यांचा प्रभाव असल्याने त्याचाही फायदा नितीन डुबल यांना मोठ्या प्रमाणात झाला.
नितीन डूबल हे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये हसून खेळून स्वभावाचे असल्याने त्यांना कुठेही विरोध झाला नाही. यापुढील काळात कोळगाव जिल्हा परिषद गटात या तिघांकडून मोठ्या प्रमाणात अशा असून ते इतर कार्यकर्त्यांना कितपत संधी देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या पुढील काळात निवडणुका लढवणे अवघड जाणार आहे, तसेच निवडणुका हा आपला प्रांत नाही अशी चर्चा सर्वसामान्य उमेदवार व मतदारांमध्ये होत आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अशा निवडणुकांमध्ये संधी कधी मिळणार हा प्रश्न सामान्य मतदार विचारत आहे.
लोकक्रांती वृत्तांकन