टीम लोकक्रांती
लिंपणगाव, श्रीगोंदा | दि.४ मे २०२३ :
तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागवडे डेफोडील्स स्कूल च्या वतीने २५ एप्रिल ते ३ मे दरम्यान श्रीगोंदा येथे संपन्न झालेल्या समर कॅम्पची सांगता प्रा.शंकर गवते यांच्या लई भारी होम मिनिस्टर या कार्यक्रमाने झाली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा ताई नागवडे यांनी भूषविले.
हा समर कॅम्प मध्ये विद्यार्थ्यांना श्लोक, योगा, आर्ट, क्राफ्ट, चित्रकला, डान्स, शिवकालीन युद्धकला, विविध प्रकारचे इनडोअर तसेच आऊटडोअर खेळ याबरोबरच स्विमिंग, हॉर्स रायडिंग, रायफल शूटिंग या साहसी खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले. कॅम्प दरम्यान सहभागी विद्यार्थ्यांनी स्वतः मातीपासून बनवलेले गणपती, ग्लास पेंटिंग, झुंबर मेकिंग या मनमोहक कलाकृतीनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले तर याप्रसंगी सादर केलेल्या शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिक आणि डान्स ने सर्वांची वाहवा मिळविली.यावेळी नॉनफायर कुकिंग स्पर्धेअंतर्गत विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ओली भेळ, सँडविच, प्रोटीन बार, मिल्क शेक, चॉकलेट बार अशा विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा मोह अनुराधा ताई नागवडे यांच्यासह पाहुण्यांना आवरता आला नाही.
प्रसंगी शर्वरी गोलांडे, सई सुपेकर, आराध्या नागवडे या विद्यार्थिनींनी अनुभव कथन करत समर कॅम्पमुळे साहसी खेळ, कलांमुळे आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले. तर प्रा.राहुल गायकवाड, सौ.नागवडे या पालकांनी मनोगत व्यक्त करतांना शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
- चौकट –
या शैक्षणिक वर्षापासून शाळेमध्ये स्केटिंग, बास्केटबॉल, रायफल शूटिंग, स्विमिंग, आर्मी प्रशिक्षण सुरू करीत असल्याचे संस्थेच्या विश्वस्त अनुराधा नागवडे यांनी सांगितले. - चौकट –
यावेळी झालेल्या लई भारी होम मिनिस्टर कार्यक्रमास सुमारे ५५० पेक्षा अधिक महिलांची उपस्थिती होती.यात सौ.रुपाली प्रमोद दंडनाईक यांनी प्रथम, सौ.राणी राहुल खोमणे यांनी द्वितीय तर सौ. शारदा विजय व्यवहारे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.या प्रसंगी विजेत्यांचा पैठणी देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी वैष्णवी नागवडे, नगरसेविका सीमाताई गोरे, पूजा लाढाणे, पूनम फिरोदिया, किरण गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.समर कॅम्प च्या यशस्वीतेसाठी तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे निरीक्षक एस.पी.गोलांडे सर, मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश आनंदकर यांनी तर प्रास्ताविक स्मिता भोईटे यांनी केले.
लोकक्रांती वृत्तांकन