टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.३१ ऑगस्ट २०२२ : श्रीगोंदा येथे कुंभार गल्ली मध्ये गणेश मूर्ती घेण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली होती श्रीगोंदा येथून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेश मूर्तींचे वितरण केले जाते त्यासाठी येथील मूर्तिकार प्रसिद्ध आहेत सुबक आणि सुरेख कलाकृती असलेल्या आणि छान रंगरंगोटी केलेल्या गणेशाच्या मूर्ती या खूपच मनमोहक बनवल्या जातात.संत शेख महंमद महाराज यांच्या पावन भूमीत श्रीगोंदा शहरात श्री गणेश गणपतींना गाव खेड्यासह राज्यभरातून मागणी असते आकर्षक सुंदर मनमोहक सुरेख रेखीव कलाकुसर असलेल्या गणरायाच्या मूर्तींचे श्रीगोंदा हे माहेर घर म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशा श्रीगोंदा शहरात कोरोनाच्या महामारीनंतर प्रथमच भरघोस विक्री होत आहे ग्राहकांच्या मनाप्रमाणे व रास्त दरात.
संपूर्ण तालुक्यामधून व शेजारील तालुक्यांमधूनही भाविक गणेश मूर्ती घेण्यासाठी श्रीगोंदा येथे येत असतात. दोन वर्षाच्या कोरोनाच्या सावटानंतर सुरू झालेल्या गणेशोत्सवाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आलेल्या भाविकांनी शेख महंमद महाराज पटांगणात गाड्यांची मोठी गर्दी केली होती या अभूतपूर्व गर्दी मुळे याठिकाणी यात्रेचे स्वरूप तयार झाले होते. गणेश मूर्ती बरोबरच इतर पूजेचे साहित्य खरेदी साठी भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे येथील व्यवसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहावयास मिळाले.
- तूच सुखंकर्ता तूच दुःखहर्ता या गणरायाच्या ओळींप्रमाणे सर्व भाविक भक्तांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसले.आजपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा!!!
स्त्रोत:(प्रत्यक्ष घेतलेल्या माहितीवरून)