लोकक्रांती Online
श्रीगोंदा, दि.३० ऑक्टोबर २०२३ :
गरजवंत मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत शांततेच्या मार्गाने त्यांनी हा लढा उभारला आहे या लढ्याला पाठिंबा म्हणून उद्या मंगळवार दि.३१ ऑक्टोबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण श्रीगोंदा तालुका बंद पुकारण्यात आला आहे तसेच नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना श्रीगोंदा बंद व रास्ता रोकोचे निवेदन देण्यात आले. यासंदर्भात आज सोमवार दि. ३० रोजी सकल मराठा समाजाची संत श्री शेख महंमद महाराज यांच्या मंदिरात पार पडलेल्या बैठकीत आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यात आली. उद्या ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ठीक १० वाजता काष्टी येथे रास्ता रोको करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला.
तसेच उद्या श्रीगोंदा शहरासह संपूर्ण श्रीगोंदा तालुका कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. श्रीगोंदा तालुक्यात सर्व राजकीय पक्षाचे आणि नेत्यांचे सार्वजनिक कार्यक्रम बंद ठेवण्यात येणार आहेत.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सबंध महाराष्ट्रात मराठा समाजाने कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक धोरण समाजाच्या वतीने निश्चित करण्यात येत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून पुढील काळात श्रीगोंद्यात साखळी उपोषण असेल, अर्धनग्न आंदोलन असेल, पदयात्रा असेल,राजकीय व्यक्तींच्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असेल अशा भूमिका घेण्याचा निर्णय बैठकीत एकमताने झाला.
यावेळी श्रीगोंदा बंदचे निवेदन नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना देण्यात आले या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून मराठा नगरसेवक गणेश भोस आणि संगीता मखरे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले.
सकल मराठा समाजाच्या बैठकीस बाबासाहेब भोस, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, भारती इंगवले, पृथ्वीराज नागवडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे,आनंद लगड, कालिदास जगताप,प्रवीण भैय्या जगताप, राजश्री शिंदे, राजाभाऊ लोखंडे,राजू मोटे पाटील आदींसह मोठ्या प्रमाणात मराठा समाज उपस्थित होता.