लोकक्रांती Online
श्रीगोंदा, दि.१३ नोव्हेंबर २०२३:
दूध उत्पादक संघर्ष समिती श्रीगोंदा च्या वतीने येत्या १९ तारखेला श्रीगोंदा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
शासनाने दुधाला ३४ रु हमीभाव जाहीर करून देखील येथील खाजगी आणि सहकारी प्लॅन्ट चालकांनी संगनमताने दुधाचे भाव पाडून २६ ते २८ रु लिटर प्रमाणे आज दुधाला बाजार मिळत आहे. उतपादन खर्चापेक्षा देखील मिळणारा दर कमी असल्यामुळे तालुक्यातील दूध उत्पादक प्रचंड अडचणीत आला आहे.
एकीकडे पशुखाद्याचे वाढलेले दर, दुष्काळ,चारा टंचाई,भेसळयुक्त दुधामुळे प्रामाणिक कष्ट करणाऱ्या शेतकर्यांवर होणारा अन्याय या सर्व गोष्टींवर आवाज उठवण्यासाठी आणि सरकारने दूध उत्पादकांची केलेल्या फसवणुकीचा निषेध म्हणून येत्या १९ नोव्हेंबर रोजी फुले सर्कल, मेन रोड श्रीगोंदा येथे सकाळी १० वाजता तालुक्यातील सर्व दूध उत्पादक शेतकरी एकत्रित येऊन रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.
यावेळी श्रीगोंदा तहसीलदार यांना निवेदन देताना सोनू कोथिंबीरे,अरविंद कापसे,सारंग होले, ऋषिकेश गायकवाड, संदीप कोथिंबीरे, नानासाहेब शिंदे, विजय वाघमारे,सागर रसाळ, प्रवीण काळे, निखिल कोथींबीरे, दादा होले,समीर कोथींबीरे आदी शेतकरी उपस्थित होते.
तालुक्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या रास्ता रोको आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन दूध उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष सोनू कोथींबीरे यांनी केले आहे.