लोकक्रांती
श्रीगोंदा, दि ७ डिसेंबर २०२३ :
सामाजिक कार्यकर्त्या पत्रकार मीरा शिंदे यांनी अनधिकृत होर्डिंग विरोधात श्रीगोंदा नगरपालिकेसमोर दोन दिवस उपोषण केले होते या उपोषणानंतर जाग आलेल्या प्रशासनाने श्रीगोंदा शहरामध्ये अनधिकृत होर्डिंग विरोधात मोठी मोहीम राबवली त्यामध्ये बरेचसे अनधिकृत होर्डिंग काढण्यात आले परिणामी ऐतिहासिक वारसा असलेले श्रीगोंदा शहराचे वैभव पुन्हा दिसू लागले व होर्डिंग्ज मुळे शहराचा घुसमटलेला श्वास आता मोकळा झाल्याने श्रीगोंदा वासीय खुश आहेत.
याबाबत सर्व शहरात होर्डिंग्ज याच विषयावर लोक आपसात चर्चा करताना दिसत आहेत.तर अनेक जण मीरा शिंदे यांना भेटून, मोबाईल वरून शहरातील गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आला त्याबद्दल धन्यवाद देत आहेत, अभिनंदन करत आहेत.
श्रीगोंदा शहरात प्रवेश करताच श्रीगोंद्याचे आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिराचा कळस आता दिसू लागला आहे त्यामुळे अनेकांचे श्रद्धास्थान असलेले श्री सिद्धेश्वरांनीच त्यांच्या अपार शक्तीने हे कार्य कोणाच्या तरी हातून करवून घेतले असावे अशीही चर्चा गावामधून होताना दिसत आहे
त्याचबरोबर श्रीगोंदा शहरातील रहदारीच्या ठिकाणी असलेले होर्डिंग काढल्यामुळे धोका कमी होऊन शहरातील हवा मोकळी झाली आहे व आजूबाजूच्या नागरिकांना मोकळा श्वास घेत असल्याची अनुभूती होत आहे असेही नागरिक बोलत आहेत.
ज्या प्रकारे ही कारवाई प्रशासनाने केली त्यासाठी श्रीगोंदा नगरपालिकेचे सामान्य नागरिकांतून स्वागत होताना दिसत आहे. आता काढलेले होर्डिंग पुन्हा लागू नयेत यासाठी प्रशासनान व श्रीगोंदा नगरपालिका काटेकोरपणे लक्ष घालणार का तसेच श्रीगोंदा शहराचे विद्रूपीकरण होण्यापासून आता थांबणार का हे येणाऱ्या काळात पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.