लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.१९ डिसेंबर २०२३ :
केवळ शिक्षकदिनाच्या दिवशीच शिक्षकांचा सन्मान होतो असे नाही तर त्यांनी विद्यार्थी हितासाठी आयुष्यभर केलेल्या त्यागामुळेच त्यांना प्रतिष्ठा प्राप्त होते. जुन्या जाणत्या शिक्षकांच्या सक्रियतेमुळे शिक्षक संघटनेचे राज्य स्तरावरील प्रश्न सुटण्यास मदतच होत आहे, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे मा. चेअरमन डॉ. संदीप मोटे पाटील यांनी केले. ढोकराई येथील प्रगती मंगल कार्यालयात जागतिक पेन्शनर्स डे निमित्त आयोजित सेवानिवृत शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेन्शनर्स संघटनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख द. म शिंदे होते. अध्यक्षपदाची सूचना भगवानराव गायकवाड यांनी तर जी एस. गावडे यांनी अनुमोदन दिले प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस अमृतमहोत्सवी शिक्षकांचे मान्यवरांचे शुभहस्ते अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी सहकारमहर्षि नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, जेष्ठ संचालक सुभाष काका शिंदे, पेन्शनर्स संघटनेचे जिल्हा सरचिटणीस ब.द.उबाळे,रामदास पंधरकर, भाऊसाहेब डेरे, अंबादास दरेकर, मिनाक्षी सुतार, अभिजित सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे वडील ज्ञानदेव लंके, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक रामदास ठाकर, श्रीगोंदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रय गावडे, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सोनलकर आण्णा, पारनेरचे तालुका अध्यक्ष बागल,गजानन ढवळे, रमेश महाराज सुपेकर, अनिल भदागरे तसेच तालुक्यातील सुमारे दोनशे सेवानिवृत्त शिक्षक बंधू – भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी मुरारी सुतार यांनी योगदान दिले. मुंबई येथील धरणे आंदोलनासाठी पाच हजार रुपयांची देणगी यावेळी डॉ संदीप मोटे पाटील यांनी दिली. या आंदोलनास बहुसंख्येने सहभागी होण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी भगवानराव गायकवाड, वसंतराव धामणे, ज्ञानदेव लाळगे , भगवान फापाळे यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन पी जे. दरेकर यांनी व आभार अंबादास दरेकर यांनी मानले.