लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.२१ डिसेंबर २०२३ :
श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा ७५ वा अमृत महोत्सव कार्यक्रम रविवार दि.२४ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वा. शाळेचे माजी विद्यार्थी साजरा करत आहेत. शाळेची स्थापन १९४८ रोजी झाली २०२३ हे अमृत मोहत्सवी वर्ष आहे यानिमित्ताने कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदेसर यांचे व्याख्यान होणार आहे. शाळेचा ७५ वा वाढदिवस साजरा करण्याचा अभिनव उपक्रम माजी विद्यार्थी करत आहेत अशा स्वरूपाचा कार्यक्रम तालुक्यामध्ये कदाचित पहिलाच असावा या कार्यक्रमाची खूप मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी सुरू आहे या शाळेतून शिक्षण घेऊन गेलेल्या शाळेच्या माझी विद्यार्थ्यांना संपर्क करून त्यांना आमंत्रित केले आहे या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत घोडेगाव व ग्रामस्थ, शाळेतील शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने आणि योगदानाने या भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमा दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे सकाळी ११ वाजता शाळेतील विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थी यांची गावातून प्रभात फेरी होईल त्यानंतर प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदेसर यांचे व्याख्यान होणार आहे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम शाळेतील मुले सादर करणार आहेत. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची मनोगते होणार आहेत. कार्यक्रमानंतर स्नेह भोजनाचे ही आयोजन करण्यात आले आहे आणि संध्याकाळी ह भ प बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे कीर्तन होणार आहे अशा स्वरूपाचा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थ्यांनी केले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आहे.
लोकसहभागातून शाळेचा कायापालट;
लोक वर्गणीतून लाखो रुपयांची कामे मार्गी!
एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेला लाजवेल अशा प्रकारची सुसज्ज आणि सुविधायुक्त जिल्हा परिषदची शाळा घोडेगाव येथे दिमागात उभी आहे वेळोवेळी लोकसहभागातून शाळेत मदत झाली आहे. या शाळेवर असलेले शिक्षक अत्यंत प्रामाणिकपणे आपले कार्य करतात सात शिक्षक असलेल्या या शाळेस सात वर्ग खोल्या आहेत. पहिले ते सातवी पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत १४४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
सध्या उपलब्ध सुविधांमध्ये मुख्याध्यापक कार्यालय, स्वच्छ सुंदर प्रांगणात काँक्रिटीकरण, क्रीडांगण, तार कंपाउंड, बाग, बागेमध्ये सिमेंट बेंचेस, एलईडी संगणक, स्वतंत्र वाचनालय, कंपाउंड भिंत, भव्य प्रवेशद्वार, मुबलक पाणी साठा,स्वच्छतागृह, प्लम्बिंग करुन कायम स्वरूपी नळ पाण्याची सोय, पिण्यासाठी फिल्टर पाणी सुविधा, हँडवॉश स्टेशन,स्वयंपाक गृह, संपूर्ण विद्युतीकरण, सौर ऊर्जा सिस्टीम,मुलांना बसण्यासाठी बेंचेस,बांधकामात ग्रॅनाईडचा वापर,भव्य ध्वज स्तंभ, सुंदर व्यासपीठ इत्यादी सुविधा शाळेमध्ये आहेत. अशाप्रकारे लोकसहभागातून अंदाजे २५ लाखापर्यंतचे कामे शाळेमध्ये झाले आहे.
शाळेतील गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम
सन २०१७ पासून आज पर्यंत शाळेतील सहा विद्यार्थी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत आलेले आहेत दोन विद्यार्थी नवोदय विद्यालयासाठी निवडले गेले आहेत एक विद्यार्थी सातारा सैनिक स्कूल साठी निवडला गेला आहे मागील वर्षी एक विद्यार्थी मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेला आहे तर यावर्षी दोन विद्यार्थी कोल्हापूर पॅटर्न साठी निवडले गेले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम, निबंध लेखन, वेशभूषा सादरीकरण, वकृत्व, गीत गायन यात दरवर्षी विद्यार्थी तालुक्यात चमकतात क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थी दरवर्षी यश मिळवतात.
शाळा व ग्रामस्थांच्या सहभागाने शाळेतील इतर उपक्रम
दरवर्षी शाळेत शैक्षणिक सहल, वार्षिक स्नेहसंमेलन, थोर महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते तसेच शाळेत सर्व शासकीय योजनांचे प्रभावी अंमलबजावणी केली जाते. मोफत गणवेश, बुट, शालेय पोषण आहार, विविध शिष्यवृत्ती, मोफत पाठ्यपुस्तके, आरोग्य तपासणी या सर्व योजना शाळेत राबविल्या जातात अर्थातच या सर्व गोष्टी गावातील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानेच शक्य होत आहेत.
अशा ह्या सुंदर शाळेचा अमृत महोत्सवी कार्यक्रम शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केला आहे त्यानिमित्ताने शाळेचा ७५ वा वाढदिवस शाळेचे माजी विद्यार्थी साजरा करत आहेत यासाठी आपणही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आपली उपस्थिती या कार्यक्रमास लावावी असे माजी विद्यार्थ्यांकडून आवाहन करण्यात येत आहे.