लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.१ जानेवारी २०२४ :
नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला अहमदनगर जिल्हा पोलीस मित्र संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकांत क्षेत्रे याच्या हस्ते श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजेंद्र रमेश राऊत यांना सन २०२२-२३ सालचा ‘कर्तव्यदक्ष पदाधिकारी’ हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि संस्थेने निर्धारित केलेला धनादेश देण्यात आला.
यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्यावतीने प्रशांत जाधव, मनोज मोईन यांनी तर अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने राहुल खंडागळे, आकाश निकम, अक्षय गाडेकर, समीर शेख, राजू ब्राम्हणे, संजय देव्हारे यांनी गुलाब पुष्पहार देऊन अभिनंदन केले.
यावेळी क्षेत्रे म्हणाले की, अहमदनगर जिल्हा पोलीस मित्र संस्थेच्या वतीने सन २०२२-२३ या वर्षाकरिता सर्व तालुकाध्यक्षांना देण्यात आलेल्या कामामध्ये राऊत यांनी आपल्या तालुक्यासह जिल्ह्यात व राज्यात सर्वाधिक बंदोबस्त घेऊन पोलीस मित्रांना सुमारे ५६७४०० रुपयांचे मानधन मिळवून दिले. कोविडसारख्या महामारीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांना रात्र गस्त, नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन, रेस्क्यू ऑपरेशन, अवैध धंद्यांवर छापा, हिस्ट्रीशुटर आणि फरारी आरोपी पकडणे यामध्ये पोलीस मित्रांनी विनामोबदला मदत केली.
व्यापारी असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत सतीश पोखरणा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र काम करणाऱ्या १८ पोलीस मित्रांचा सन्मान कापड व्यावसायिक, मंडप असोसिएशन, मेडिकल असोसिएशनकडून करण्यात आला. संस्थेच्या कार्यालयात आयोजित वार्षिक आढावा बैठक कार्यक्रमात सर्वानुमते त्यांना ‘कर्तव्यदक्ष पदाधिकारी’ हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट व दर्जेदार कामकाज अशी त्यांची संस्थेमध्ये ओळख असून संस्थेचे नियम व संस्थेप्रती निष्ठा याविषयी राऊत हे नेहमीच जागरूक व चोख असल्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष क्षेत्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. राऊत यांना मिळलेल्या पुरस्कारामुळे नातेवाईक, मित्र परिवाराकडून यांच्यासह सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.