लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ९ एप्रिल २०२४ :
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्या मार्फत कारखान्याच्या हमीवर येत्या गळीत हंगामामध्ये तालुक्यातील २० इच्छुक शेतकऱ्यांना हार्वेस्टर मशीन खरेदी करून देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी दिली.
प्रसिद्धी पत्रकात राजेंद्र दादा नागवडे यांनी म्हटले आहे की, दिवसेंदिवस कारखान्यांना ऊस तोडणी मजुरांची कमतरता भासणार असून कारखान्यास दैनंदिन गाळप क्षमते इतका ऊस पुरवठा होत नाही. त्यामुळे ऊस तोडी करिता हार्वेस्टर मशीन खरेदी करणे अनिवार्य झाले आहे. नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील व तालुक्यातील हार्वेस्टर मशीन खरेदी करू इच्छित असलेल्या शेतकऱ्यांना हमीपत्र देऊन बँकेकडून कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून देणे करिता कारखान्यामार्फत सर्व मदत केली जाईल. हार्वेस्टर खरेदीदार इच्छुकांची संख्या वाढल्यास त्यांनाही कारखाना हमी देऊन कर्ज प्रकरण मंजुरीसाठी सर्व सहकार्य करणार आहे. तसेच आपल्या भागामध्ये हार्वेस्टर मशीन ऑपरेटरची सुद्धा कमतरता भासते. त्याकरिता कारखान्यामार्फत इच्छुक ऑपरेटरला मोफत प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
तरी येत्या पंधरा दिवसांमध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील व तालुक्यातील हार्वेस्टर मशीन खरेदी करण्यास इच्छुक असणाऱ्या सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याच्या शेतकी विभागाशी संपर्क करून आपले नाव नोंदणी करावी. तदनंतर सर्व इच्छुक शेतकऱ्यांची एकत्रित सहविचार सभा घेऊन त्याबाबतची सविस्तर माहिती दिली जाईल व हार्वेस्टर मशीन खरेदी बाबतची पुढील कार्यवाही टप्प्याटप्प्याने सुरू केली जाईल. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी आपली नाव नोंदणी नागवडे कारखान्याच्या शेतकी विभाग कडे करावी. असे आवाहन चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी केले आहे. यावेळी व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, संचालक मंडळ सदस्य, प्रभारी कार्यकारी संचालक सतीश जांभळे, शेतकी अधिकारी सचिन बागल, प्रसाद भोसले आदी उपस्थित होते.