लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.२९ एप्रिल २०२४ :
भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे येथील पोतदार सभागृहात प्रेक्षकांच्या गर्दीत “वैभवशाली ऐतिहासिक श्रीगोंदा”या पुस्तकाचे प्रकाशन थाटात पार पाडले.ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचे हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून पुरातत्व अभ्यासक सचिन पाटील कोल्हापूर, अनिल दुधाणे इतिहास संशोधक पुणे,पानिपतवीर जानराव वाबळे यांचे वंशज नितिन वाबळे,आयसर वैज्ञानिक संस्थेचे शास्त्रज्ञ अशोक रुपनेर, ज्येष्ठ इतिहास लेखक सुरेश शिंदे,बारव अभ्यासक प्रमोद काळे,मनोज सिनकर आदी मान्यवर उपस्थित होते.या सोहळ्यास पुणेकर रसिक श्रोत्यांसोबत अहमदनगर, पुणे, सातारा, जिल्ह्यातील शिवप्रेमी, इतिहासप्रेमी बहुसंख्येने उपस्थीत होते.”किल्ले दाखवणारा माणूस” म्हणून ओळखले जाणारे लेखक राजेश इंगळे यांच्या संकल्पनेतून ‘ शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन’ या संस्थेच्या वतीने आणि शेकडो सदस्यांच्या सहकार्यातून “वैभवशाली ऐतिहासिक श्रीगोंदा” या पहिल्या संदर्भग्रंथाची निर्मिती झाली.
श्रीगोंद्यातील महादजी शिंदे वाडयाचे स्मारक व्हावे- पांडुरंग बलकवडे.
यावेळी अध्यक्ष पदावरून बोलतांना पांडुरंग बलकवडे यांनी उपस्थित श्रीगोंदेकरांना आवाहन केले की, या पुस्तकाच्यारूपाने पुन्हा नव्याने श्रीगोंदयाचा इतिहास उजेडात आला आहे. श्रीगोंद्यातील सरदार महादजी शिंदे यांचा वाडा जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. या वाड्यात शिंदे घराण्याच्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. कोट्यवधी रुपये खर्च केले तरी ही वास्तू पुन्हा उभी राहणार नाही. त्यासाठी हा वाडा आताच वाचवावा लागेल. शिंदेशाहीचे वैभव सांगणारा हा वाडा आहे. रयत शिक्षण संस्थेला सर्वजण विनंती करु. हा वाडा संवर्धन करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. भारत इतिहास संशोधन मंडळ सहकार्यकरेल. श्रीगोंदेकरांनी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेला सोबत घेऊन हे कार्य हाती घ्यावे. सचिन पाटील यांनी कातळशिल्प, प्राचिनगुहा, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, मराठा कालखंडातील श्रीगोंद्याचा पुरातन वारसा उलगडून दाखवला. अनिल दुधाणे यांनी विरगळ, शिलालेखांच्या माध्यमातुन महाराष्ट्रात मोठं कार्य उभे केले. म्हणून त्यांचा “विरगळ विरश्री” म्हणून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव सोमेश शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. भरत खोमणे, प्रांजल कुलकर्णी यांनी केले. आभार मारूती वागस्कर यांनी व्यक्त केले. यावेळी अहमदनगर जिल्हा शिक्षक बँकेचे मा.चेअरमन डॉ संदीप मोटे पाटील,संदिप होले, गोवर्धन दरेकर, पत्रकार बाळासाहेब काकडे, विजय उंडे, खंडेराव जठार, प्रमोद कुलकर्णी, विठ्ठल ढाणे, अजित दळवी यांसाह शिवदुर्ग चे सदस्य उपस्थित होते.