लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.२७ जून २०२४ :
नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त व उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोच्च न्यायालयात आपल्याकडे धान्य घेत असलेले सर्व लाभार्थी पात्र व सत्य आहेत. ही माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर करायची असल्याने नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. प्रविण देडाम व उपायुक्त प्रज्ञा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या जिल्ह्यात प्रत्येक स्वस्त धान्य दुकानाला जोडलेल्या शिधापत्रिकेतील धान्याचा लाभ घेत असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय लाभार्थी कार्डातील प्रत्येक सदस्याचे ई-केवायसी प्रमाणीकरण बंधनकारक असल्याने दुकानदारांनी पूर्णवेळ दुकान सुरु ठेवून वेळेत प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे ई-केवायसी प्रमाणीकरण दि.३० जून पर्यंत पूर्ण करावे. ज्यांचे प्रमाणीकरण होणार नाही, अशा सदस्यांना धान्यातून वगळले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने ई-केवायसी प्रमाणीकरण वेळेत करून घ्यावे, असे आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांनी केले आहे.
तसेच श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी बांधवानी देखील सन २०२२- २०२३ सततचा पाऊस व अतिवृष्टीने बाधित झालेले शेतकरी यांच्या ग्रीव्हेन्स व ई- केवायसी स्वतंत्र याद्या तलाठी कार्यालयामध्ये व सेतू केंद्रामध्ये दिलेल्या आहेत. तरी शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या महा-ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन आपल्या आधार क्रमांकावरून ग्रीव्हेन्स व ई केवायसी याबाबतची कार्यवाही करावी. ग्रीव्हेन्सची पडताळणी झाल्या नंतर संबंधित शेतकरी यांनी आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, सातबारा व ८ अ घेऊन तहसिल कार्यालयामध्ये आपत्ती शाखेमध्ये जमा करावे. ई-केवायसीची यादी प्रत्येक गावातील तलाठी यांच्याकडे दिलेली आहे,सदर यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत, त्यांनी महा-ईसेवा केंद्रात जाऊन ई-केवायसी करून घ्यावी.
तरी ३० जून २०२४ पर्यंत लाभार्थ्यांनी ग्रीव्हेन्स व ई-केवायसी प्रमाणीकरण करून घेऊन प्रशासनास सहकार्य करावे व स्वतःचे संभाव्य नुकसान टाळावे असे आवाहन आमदार पाचपुते यांनी केले आहे.