लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.२९ जून २०२४ :
समाजात लग्नाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक होत आहे. लग्नाला मुलगी दाखवून आपली कोथळी भरणाऱ्यांची टोळीच सध्या सर्वच ठिकाणी कार्यरत आहे. याबरोबर लग्न करून दागिने व पैसे घेऊन वधू पळून जाण्याच्या अनेक घटना घडत आहे. अशाच एका नवरोबाला लुटणारी नवरीसह ३ जणाची टोळी श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव येथे तीन दिवसापूर्वी २ लाख ३० हजार रुपये देऊन झालेल्या लग्नाचे श्रीगोंदा कोर्टात लग्न रजिस्टर करण्यासाठी नवरी आणी तिच्या आईने बहाणा करून नवरदेवाची आई व वडील यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकुन चारचाकी वाहनातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अँड. अक्षय जठार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ पकडुन नवरी मुलगी, तिची आई, गाडी ड्रायव्हर व त्याच्या सहकाऱ्याला या अशा चार जणांना गाडीसह श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले.
अशोक हरिभाऊ ओगले यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नितीन अशोक ओगले (रा. मुंगुसगाव, ता. श्रीगोंदा) यांचे लग्न सिमरन गौतम पाटील (रा. चोरंबा पोस्ट मोहाडा, ता. घाटंजी, जि. यवतमाळ) यांचा विवाह मध्यस्थी असणारे सचिन जाधव (रा. घाटंजी, जि. यवतमाळ) याने २ लाख ३० हजार रूपये रोख घेऊन लग्न जमवले आणि बुधवारी (दि. २६) दुपारी कोळगाव येथील साकेवाडी येथे तीन दिवसापूर्वी दत्त मंदिरात विवाह संपन्न झाला. शुक्रवार दि.२८ रोजी १२ वाजण्याच्या सुमारास नवरी मुलगी सिमरन गौतम पाटील तिची आई आशा गौतम पाटील, नितीन अशोक ओगले, अशोक हरिभाऊ ओगले, लंकाबाई अशोक ओगले हे सर्व मिळून श्रीगोंदा येथील न्यायालयात लग्नाची
नोटरी करण्यासाठी अँड. जठार यांच्याकडे आले होते. त्यावेळी नवरदेव वकिलांशी बोलत असताना नवरी मुलगी सिमरन व तिची आई आशा यांना घेण्यासाठी शेख शाहरुख (गाडी चालक), दीपक पांडुरंग देशमुख हे दोघे एर्टिगा गाडी क्र. एम. एच.२६ एके. १५३६ पळून जाण्यासाठी दबा धरुन बसले होते. अचानक नवरीची आई आशा गौतम पाटील हिने जवळ असलेल्या पिशवीतून मिरची पावडर काढून मुलाच्या आईच्या डोळ्यात फेकुन तात्काळ गाडीत जाऊन बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेथे उपस्थित असलेल्या काही नागरिकाच्या डोळ्यात मिरची पावडर गेल्याने एकच गोंधळ उड़ाला व आरडाओरड झाल्याने प्रसंगावधन राखून अँड. जठार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ गाडी अडवून सर्वांना श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले.