लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.२९ जून २०२४ :
श्रीगोंदा शहरात आज पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी श्रीगोंदा शहरातील एसटी स्टँड परिसरात, वर्दळीच्या ठिकाणी पाच ते सात दुकानांचे शटर तोडुन चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. व्यावसायिकांच्या दुकानांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरनीवर आला आहे असे म्हणावे लागेल.
श्रीगोंदा पोलीस घटनास्थळी येऊन पाहणी केली असता ठसे तज्ञ पाचरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. श्रेया मोबाईल, जीके केक, श्रावणी मोबाईल, आणि वैभव हॉटेल या दुकानांची शटर तोडून चोरांनी आत प्रवेश करत मोबाईल व रोख रक्कम लंपास केले आहे. शेजारी असलेल्या सिद्धेश्वर मोबाईल व ग्राहक सेवा केंद्रातही चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
या चोरीमध्ये दुकान मालक मोरे, संपत खराडे, गुलाब गुप्ता, आणि वैभव खेंडके यांचे नुकसान झाले आहे. जीके केक येथून चार केक आणि आठशे रुपये रोख, श्रावणी मोबाईल मधून २५ ते ३० जुने/नवीन अँड्रॉइड मोबाईल, तसेच वैभव हॉटेल मधून ३० ते ३२ हजार रुपये रोख चोरी झाल्याचे दुकानदार बोलत आहेत.या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस करीत आहेत.