लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २१ जुलै २०२४ :
तालुक्यातील बोरी येथे शनिवार दि. २० जुलै रोजी रात्री ०२:२० वा. च्या सुमारास ५ ठिकाणी एकाच रात्री चोरीचा प्रयत्न झाला त्यामध्ये बोरी गावातील शेळके वस्ती माडी या परिसरात राहणारे बोरी गावातीलच राजू शंकर चोरमले यांच्या घरी रात्री दोन वाजता तीन चोर आले होते तीन चोरांनी घरातील दोन पेट्या घेऊन जाऊन शेतामध्ये डाळिंबाच्या बागेत फोडल्या सुदैवाने पेटीमध्ये जास्त मौल्यवान वस्तू नव्हत्या मात्र महिलांच्या नाकातील दागिने सोन्याच्या २ नथा आणि पायातील पैंजण तसेच शेतमाल विकून आलेले एकूण आठ हजार रुपये व महिला भगिनींच्या नवीन साड्या होत्या त्यांची चोरी झाली.
त्यानंतर भानुदास चोरमले यांच्या घराच्या मागील बाजूस असणारी खिडकी तोडून चोर खिडकीतून घरात गेले घरातील सुटकेस घेऊन सुटकेस शेतामध्ये फोडले सुटकेसमध्ये रोख रक्कम पाच हजार रुपये आणि नवीन वस्त्र होते, त्या ठिकाणाहून चोर भरत शेळके यांच्या बंगल्यात जाऊन बंगल्यातील एक सुटकेस आणि पर्स चोरी केली सुदैवाने पर्समध्ये आणि सुटकेसमध्ये ही फारशा मौल्यवान वस्तू नव्हत्या मात्र महिला भगिनींचे सौंदर्य प्रसाधने आणि सुटकेस मधील नवे कोरे कपडे चोर घेऊन गेले.
भरत शेळके यांचा पाळीव कुत्रा फार प्रामाणिक आणि सजग असल्याने कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाजाने घरातील लोक जागे झाले त्या क्षणी चोरांनी कुत्र्याला काहीतरी आमिष दाखवून खायला दिले कुत्र्याने काहीतरी खाल्ल्यानंतर कुत्रा मात्र एकदम शांत झाला कुत्रा एका जागेवरून हलेनासा झाला.
ही बाब शेळके कुटुंबांच्या लक्षात येताच शेखर शेळके यांनी ग्राम सुरक्षा समितीचे अध्यक्ष पत्रकार प्रदीप राजु हिवाळे यांना माहिती दिली आणि प्रदीप राजु हिवाळे यांनी तातडीने ग्राम सुरक्षा यंत्रणेला संदेश दिला त्यानंतर गावातील सर्व लोक जागे झाले, घटनेची माहिती मिळाली त्याच वेळी चोर पंडित चोरमले, मच्छिंद्र चोरमले यांच्या घरी चोरी करण्यास गेले मात्र चोर आणि यंत्रणेचा संदेश एकाच वेळी आल्याने परिसरातील लोक जागे झाले त्या ठिकाणी चोरी करण्याचा चोरांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही.
यावेळी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी आणि योग्य वेळी योग्य वापर केल्याने गावातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. अशी माहिती ग्राम सुरक्षा समितीचे अध्यक्ष प्रदीप राजू हिवाळे यांनी प्रसार माध्यमांना दिली.