लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २१ जुलै २०२४ :
भिंगाण शिवारातील एका दुर्दैवी घटनेत, मजुरीसाठी गेलेल्या ३० वर्षीय आदिवासी युवकाचा ट्रॅक्टरच्या अपघातात मृत्यू झाला. भरधाव वेगात चालवलेल्या ट्रॅक्टरचा भिंगाण ते शेडगाव या दरम्यान जाणाऱ्या कच्च्या रोडवर अपघात झाला.अपघाताच्या ठिकाणी किशोर गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आढळला.
सविस्तर माहिती अशी की सुभाष गुलाब गायकवाड यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे दाखल केलेल्या फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता दत्तप्रसाद उर्फ बाबु जगन्नाथ अधोरे यांनी किशोर गायकवाड यांना ट्रॅक्टरवर मजुरीसाठी नेले होते. परंतु, भरधाव वेगात चालवलेल्या ट्रॅक्टरचा भिंगाण ते शेडगाव जाणाऱ्या कच्च्या रोडवर अपघात झाला.अपघाताच्या ठिकाणी किशोर गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आढळला. शेतकरी सागर अहिरे आणि इतर गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना तातडीने श्रीगोंदा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
फिर्यादीत गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधोरे अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेले. पोलीसांनी भारतीय दंड संहिता कलम १९४ अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.