लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २१ जुलै २०२४ :
कोळगाव येथील नगर दौंड रस्त्यावर असणाऱ्या विशाल ट्रेडिंग कंपनीमध्ये चोरट्यांनी रोख रक्कम एक लाख १८ हजार सह पत्रा, सिमेंट ,लोखंडी जाळी, पाण्याच्या टाक्या, चौकटी असा साडेसात लाखाचा मुद्देमाल पहाटे दोन ते पाच च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला . घटनास्थळी डॉग स्कॉड, ठसे विशेतज्ञ, व बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गाजरे यांनी भेट देऊन पंचनामा केला.
नगर दौंड रस्त्यावर कोळगाव फाटा जवळील विशाल सुभाष लगड यांच्या मालकीचे विशाल ट्रेडिंग कंपनी नावाचे दुकान अज्ञात चोरट्यांनी रात्री दोन ते पहाटे पाचच्या दरम्यान लोखंडी शटर चे कुलूप न तोडता पट्ट्या उचकवून आत प्रवेश केला. तेथील उजव्या बाजूला असलेले कार्यालयातील सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर प्रथम ताब्यात घेतला. त्यामुळे सीसीटीव्ही यंत्रणा निकामी झाली. कार्यालयातील दोन ड्रॉवर मधील एक लाख व १८ हजार रक्कम ताब्यात घेतली.नंतर चोरांनी आपला मोर्चा शेड मधील लोखंडी व इतर साहित्याकडे इतर वळविला. तेथील ८० लोखंडी पत्रे , १० लहान व १५ मोठ्या पाण्याच्या टाक्या, ४०० किलो लोखंडी पाईप, पंधरा लोखंडी जाळ्या, ५० सिमेंटच्या गोण्या असे बांधकाम साहित्य चोरून नेले. शेड मधील असलेल्या अगरबत्ती उद्योग समूहातील इन्वर्टर सुद्धा चोरांनी चोरून नेला.
सकाळी वडील सुभाष लगड हे साडेआठ वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांनी शटर वर केले व आतील चोरीचा प्रकार उघडकीस आला .त्यांनी विशाल ट्रेडिंगचे मालक विशाल लगड यांना तसेच पोलीस स्टेशनला चोरीच्या घटनेची कल्पना दिली. घटनास्थळी नगरहून खास पाचारण केलेले डॉग स्कॉड, ठसे तज्ञ व बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गाजरे साहेब हजर झाले. डॉग स्कॉड दुकानासमोरील नगर दौंड रस्त्यापर्यंतचा माग काढला. तर ठसे तज्ञांनी विविध ठिकाणचे ठसे घेतले असता त्यांना तीन जणांचे ठसे तेथे आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. घटनेचा तपास बेलवंडी पोलीस स्टेशनचे हवालदार करत आहेत.
चौकट : कोळगाव परिसरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. दुचाकी वाहने चोरून नेणे, शेतातील माल लंपास करणे, लहान मोठ्या चोऱ्या करणे, देवीच्या मंदिरामध्ये चोरी करणे, दिवसाढवळ्या वाड्या वस्त्यांवर लोकांना धमकावून चोरी करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, चोरीच्या घटनांचा तपास वेगाने करावा व चोरांवर दहशत निर्माण करावी अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा कोळगावचे सरपंच पुरुषोत्तम लगड व सोसायटी चेअरमन हेमंत नलगे यांनी दिला आहे.