लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २३ जुलै २०२४ :
रविवार दि. २१ जुलै रोजी सौरभ बोरा (तिरुपती तिरूमला देवस्थानचे ट्रस्टी) व डॉक्टर शैलेश गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहोळा संपन्न झाला. सौरभ बोरा यांनी भाषणात श्रीगोंदेकरांना आवर्जून नमूद केले की या मंदिराचे पावित्र्य व स्वच्छता सगळ्यांनी मिळून सांभाळावी आणि श्री तिरुपती बालाजी येथे जशी शोडोपचार पूजा होते तशी पूजा येथे श्रीगोंद्यात सुद्धा चालू करण्यास सांगितले. त्यांनी गावकऱ्यांना एकत्र येऊन देवासाठी देणगी किंवा इतर स्वरूपात मदत करून हे मंदिर प्रति बालाजी करण्याचे आवाहन केले.
डॉक्टर शैलेश गुजर यांनीही याप्रसंगी सर्व गावकऱ्यांना नमूद केले की हे मंदिर हे प्रति बालाजी होणारच आणि त्यासाठी सर्वांनी आपले तन,मन,धन अर्पण करून कामाला लागावे. डॉक्टर प्रशांत सुरू (नीरा नरसिंगपूर देवस्थानचे ट्रस्टी) यांनी आपल्या भाषणात नमूद केले , की हे मंदिर अडीचशे वर्षे जुने आहे. मोरेश्वर क्षीरसागर यांनी हे मंदिर बांधले होते. तेव्हाचे शिंदे सरकार म्हणजे जनकोजी शिंदे यांनी त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना सनद दिली होती. तेव्हापासून साधारण सात ते आठ पिढ्या क्षीरसागर आणि नंतर दीक्षित कुटुंब हे मंदिर सांभाळत आहेत.
१९८८ साली, नगरचे परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या हस्ते, आधीची जीर्ण झालेली मूर्ती बदलून नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली गेली. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी परमपूज्य क्षीरसागर महाराज यांच्या स्मृती दालनाचे उद्घाटन सौरभजी बोरा व डॉक्टर शैलेश गुजर यांच्या हस्ते करण्यात आले. सुरू यांनी लक्ष्मी कन्स्ट्रक्शन चे श्रीरंगप्पा व श्री लिंगेश्वर यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. लक्ष्मी कन्स्ट्रक्शन च्या टीमने मंदिराचा रंग काढून त्याला मूळ पाषाण स्वरूप प्राप्त करून दिले, मंदिराचे जीर्ण झालेले खांब बदलले, व इतर परिसरही सुशोभित केला.
याप्रसंगी धनंजय झरकर यांच्याकडून महाप्रसाद व उदय कुलकर्णी यांच्याकडून लाडू वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास साधारण २-३ हजार भाविकांनी उपस्थिती नोंदवली. संध्याकाळी डॉक्टर विकास वैद्य व मनीषा वैद्य आणि आशिष केसकर व भाग्यश्री केसकर यांच्या सुमधुर भजनांनी भक्तांचा आनंद द्विगुणित केला. नगरचे ह. भ. प. श्री योगेश कुलकर्णी यांनी याप्रसंगी नारदीय कीर्तन सादर करून भक्तांना कृतकृत्य केले. ऋग्वेद दीक्षित यांनी याप्रसंगी गावकऱ्यांचे आभार मानले.
या लोकार्पण सोहळ्याच्या नियोजनासाठी प्रसन्न राक्षे, ओंकार खळदकर, नितीन कटारिया,शिवाजी साळुंखे, सागर गोरे, सागर झरकर, हरी चौधरी, भूषण चौधरी, कृष्णा काका चौधरी, बाळकाका चौधरी, सतीश खेतमाळीस, ज्ञानेश्वर खेतमाळीस, बापू खेतमाळीस, अण्णा पाटील, अरुण रसाळ, एड.एम आर फडणीस, संदीप कुलकर्णी, कृष्ण जोशी, मिलिंद कुलकर्णी, दत्ताजी जगताप, उमेश जाधव, पावशे यांचे विशेष आभार मानले.
त्या आधी एक दिवस म्हणजे २० जुलै २०२४ रोजी श्री बालाजीच्या उत्सव मूर्तीची रथावरून ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली होती.या ग्राम प्रदक्षिणेला गावकर्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. घरोघरी सडा रांगोळी काढून व देवाचे औक्षण करून स्वागत करण्यात आले होते. श्री सुद्रिक महाराजांच्या संस्थेच्या ५० शाळकरी मुलांच्या टाळ मृदूंगाचे शिस्तबद्ध सादरीकरण केले.एक अविस्मरणीय अनुभव श्रीगोंदेकर भाविकांनी घेतला.