लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २७ जुलै २०२४ :
श्रीगोंदा शहरातील बाजार तळामध्ये नगरपालिकेने विक्रेत्यांना बसण्यासाठी ओटे आणि छत केलेले आहेत परंतु तालुक्याच्या ठिकाणचा बाजार असल्यामुळे ही जागा अपुरी पडत असून उर्वरित जागेमध्ये पावसाच्या पाण्यामुळे चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
श्रीगोंदा शहराच्या पूर्वभागात बस स्थानकाच्या बाजूला दर सोमवारी मोठा आठवडे बाजार भरतो. श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिक आठवडे बाजारासाठी मोठ्या संख्येने येत असतात. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. बाजार तळात कुठल्याही प्रकारचा मुरुम अथवा सपाटीकरण केलेले नाही त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचत असुन सर्व बाजारतळ चिखलमय झाला असल्याने ग्राहकांसह भाजी विक्रेते यांना अक्षरशः चिखलात बसावे लागते. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असुन नागरीकांना बाजारात फिरणेही मुष्किल झाले आहे.
नगरपालिकेने कमिटीची कर वसुलीचा ठेका खाजगी ठेकेदाकडे दिला आहे. प्रती कॅरेट १० रुपया प्रमाणे विक्रेते यांच्या कडून मोठ्या प्रमाणावर कर वसूल केला जात आहे मात्र बाजारात पाण्याची व बसण्याची सोय नसल्याने विक्रेते व नागरिक नगरपालिकेवर नाराजी व्यक्त करत आहेत. नगरपालिका प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.