लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.१४ ऑगस्ट २०२४ :
कोळगाव येथे ग्रामपंचायत च्या कामासाठी स्वतंत्र ग्रामविस्तार अधिकारी असण्याची गरज असून गेल्या सात-आठ महिन्यापासून ग्राम विस्ताराधिकारी आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस हजर राहतात व दोन-तीन दिवसात फक्त आठ ते दहा तास ऑफिसमध्ये बसतात. कोळगाव सारख्या मोठ्या गावाला स्वतंत्र ग्रामसेवक आवश्यक आहे. त्यासाठी बुधवार दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी नगर दौंड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बाळासाहेब नलगे यांनी दिली आहे.
बाळासाहेब नलगे यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कोळगाव हे १५००० लोकसंख्येचे तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून ग्रामपंचायत च्या कामासाठी स्वतंत्र ग्राम विस्तार अधिकारी येथे उपलब्ध नाही. गेल्या सात आठ महिन्यापासून ग्राम विस्तार अधिकारी आठवड्यातून फक्त दोन किंवा तीन दिवस हजर राहतात व या दोन ते तीन दिवसात फक्त आठ ते दहा तास ऑफिसमध्ये बसतात. त्यामुळे जनतेच्या कामास विलंब होतो व नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. गट विकास अधिकारी यांना माहिती देऊनही त्यांनी यामध्ये लक्ष घातले नाही. त्यामुळे बुधवार दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी नगर दौंड रस्त्यावर सकाळी ११ वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीगोंद्याचे तहसीलदार, तालुका विकास अधिकारी व कोळगाव ग्रामपंचायत यांना देण्यात आले आहेत.
चौकट
सध्याचे ग्रामसेवक हे कोळगाव व काष्टी या दोन मोठ्या गावचे ग्रामसेवक असल्याने दोन्ही गावाकडे त्यांना पुरेसा वेळ कामकाजासाठी मिळत नाही. त्यामुळे दोन्ही गावच्या नागरिकांच्या कामकाजास विलंब होत आहे. कोळगाव मध्ये नागरिकांची कामे वेळेवर न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.