लोकक्रांती
श्रीगोंदा, दि १४ ऑगस्ट २०२४ :
कोळगाव येथील बाळासाहेब नलगे यांच्या आंदोलनाला यश कोळगाव ग्रामपंचायत मध्ये पूर्ण वेळ ग्रामसेवक उपलब्ध करून देण्यासाठी माजी उपसभापती बाळासाहेब नलगे यांच्या नेतृत्वाखाली कोळगाव येथे बुधवारी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाची दखल घेऊन गटविकास अधिकारी पंचायत समिती श्रीगोंदा यांचे लेखी पत्रानुसार 16 ऑगस्ट रोजी कोळगाव ग्रामपंचायतला पूर्णवेळ ग्रामसेवक उपलब्ध करून देण्याची मागणी पूर्ण झाल्याने बाळासाहेब नलगे यांनी आंदोलन स्थगित केले आहे.
बाळासाहेब नलगे यांनी दिलेल्या निवेदनानुसार 14 ऑगस्ट रोजी नगर दौंड रस्त्यावर सकाळी 11 वाजता पूर्ण वेळ ग्रामसेवक उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाची दखल घेऊन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बनकर, यादव व हराळ यांनी समक्ष आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व त्यांना गटविकास अधिकारी यांचे लेखी पत्र दिले. त्या पत्रानुसार, आपण कोळगाव ग्रामपंचायत पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी मिळणे बाबत मागणी केली आहे. सद्यस्थितीत हर घर तिरंगा अभियान चालू असल्याने दिनांक 15 ऑगस्ट 2024 पर्यंत ग्रामविकास अधिकारी बदलणे शक्य होणार नाही. तरी आपल्या अर्जाचा गांभीर्याने विचार करून दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या ग्रामपंचायतीस पूर्ण वेळ ग्रामसेवक देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे लेखी पत्र दिल्याने बाळासाहेब नलगे यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य संकेत नलगे, चिमणराव बाराहाते, कुकलाल काळे, राजाराम काळे, बबनराव शिंदे, शंतनू नलगे, नवनाथ मोहारे, अनिकेत शिंदे, शंतनू लगड, चंदन व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.