लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. १५ ऑगस्ट २०२४ :
शहरातील वडळी रोड वरील गजानन कॉलनी येथील गुटख्याच्या गोडाऊनवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत राज्यात विक्रीस बंदी असलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या २ लाख १६ हजार २०४ रुपये किमतीच्या गुटखा पानमसाल्यासह एकूण ६ लाख १६ हजार २०४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवार दि.१३ रोजी करत या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करत याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल आकाश राजेंद्र काळे यांच्या फिर्यादीवरून रवी बबन दळवी(वय – ३९ वर्षे, रा. रोकडोबा चौक, श्रीगोंदे), पांडू उर्फ शकील तांबोळी, शोएब शकील तांबोळी(दोघे रा. करमाळा, जि. सोलापूर) या तिघांविरुद्ध श्रीगोंदे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन रवी बबन दळवी याला अटक करण्यात आली.
याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना श्रीगोंदा शहरातील वडळी रस्त्यावरील कॉलनीमध्ये गुटख्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पथक पाठवत शहरातील वडळी रस्त्यावरील गजानन कॉलनी परिसरातील एका गोडाऊन वर छापा टाकला. त्यावेळी रवी दळवी हा गोदामामध्ये बसलेला होता. तिथे झाडाझडती घेतली असता गोदामात राज्यात विक्रीस बंदी असलेला शरीरास अपायकारक असलेला २ लाख १६ हजार २०४ रुपये किमतीचा गुटखा पानमसाला आढळून आला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरचा गुटखा शकील व शोएब तांबोळी यांच्याकडून आणल्याचे त्याने सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पानमसाला व चारचाकी असा एकूण ६ लाख १६ हजार २०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत रवी दळवी याला ताब्यात घेतले. पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेशकुमार बडे पुढील तपास करीत आहेत.