लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. १८ ऑगस्ट २०२४ :
श्रीगोंदा-जामखेड महामार्ग क्र ५४८डी या रस्त्याव शहरातील औटेवाडी येथे शुक्रवार दि. १६ रोजी रात्री ९:१५ च्या सुमारास जेवण झाल्यानंतर शतपावली करत असलेल्या व्यक्तीला एका स्विफ्ट कारने धडक दिल्यामुळे पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. या भरधाव कारने एका दुचाकीला धडक दिली असून दुचाकी चालकही गंभीर जखमी झाला. दरम्यान शनिवारी सकाळी नगरच्या सिव्हील रुग्णालयात उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की हा अपघात श्रीगोंदा -जामखेड रस्त्यावर शहरातील औटेवाडी येथे शुक्रवारी रात्री ९:१५ च्या सुमारास घडला यात गणपत तुळशीराम औटी, वय ४२, रा. औटेवाडी, ता. श्रीगोंदा व विशाल गुळवे, वय २६, रा. नांदुरा, ता. अहमदपूर, जि.लातूर अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.औटेवाडी येथील गणपत औटी शुक्रवारी रात्री जेवण करून रस्त्याच्या बाजूने फिरत होते. त्यावेळी आढळगाव ते श्रीगोंदा दिशेने भरधाव स्विफ्ट कारने त्यांना जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. स्थानिक दोन तरुण त्यांना मोटारसायकलवर उपचारासाठी नेत होते. वाटेतच चंद्रमा पेट्रोल पंपाच्या पुढे औटी यांचा मृत्यू झाला. याच भरधाव कारने पुढे दुचाकीस्वार विशाल गुळवे याला उडवले. त्यात तो गंभीर झाला.
दोघांना उडवून कार अंधाराचा फायदा घेत
श्रीगोंद्याच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेली.त्यानंतर जखमी दुचाकीस्वाराला श्रीगोंद्यात सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास नगर येथे सिविल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.परंतु शनिवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान विशाल गुळवे यांचा मृत्यू झाला. मृत गणपत औटी यांच्यावर शोकाकुल वातावरणात औटेवाडी येथे शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
धडक देणाऱ्या स्विफ्ट कारचा पोलिसांनी शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी औटेवाडी ग्रामस्थांनी केली. या अपघाताबाबत श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस हवालदार मुकेश बडे करीत आहेत.