लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २७ ऑगस्ट २०२४ :
सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची सन २०२३-२४ या आर्थिकवर्षाची ५९ वी अधीमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. साखर कारखान्याचे सभासद व ऊस उत्पादकांची चालू वर्षीची दिवाळी गोड करणार असे आश्वासन सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी आयोजित वार्षिक सभेत बोलताना दिले. सभेपुढे एक ते दहा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्या सर्व विषयांना सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सहकार महर्षी बापूंना अभिवादन करत म्हणाले की या कारखान्याचे जवळपास ३० हजार सभासद आहेत. त्यापैकी साडेसात हजार सभासदांचाच ऊस गाळापाला येत असेल तर त्याचा गाळपावर मोठा परिणाम होतो. परिणामी कारखान्याची रिकवरी देखील कमी होते. कारखान्याची जेवढी रिकवरी जास्त तितका ऊस भाव दिला जातो हे सहकाराचे सूत्र आहे. नागवडे कारखान्याची उभारणी झाल्यापासून सभासदांना सहकार महर्षी बापूंच्या प्रमाणेच आम्ही देखील सन्मानाची वागणूक देत आहोत. नागवडे कारखाना साडेपाच हजार मेट्रिक टनाने चालायला हवा परंतु ऊस उत्पादक उस व सभासद हे बाहेरील कारखान्यांना ऊस पाठवतात. त्यामुळे कारखाना गाळप हंगामात साडेचार हजार मेट्रिक टनाने चालवावा लागतो. आगामी काळात हंगामात ऊस तोडी बाबत सुसूत्रता येण्यासाठी शेतकी विभागाला सक्त सूचना केल्या जातील. बाहेरील कारखाने हे ऊसतोड मजुरांना जास्तीचे ऊसतोड अमिष दाखवतात त्यामुळे आपल्या कारखान्याकडे ऊसतोड मजूर येत नाहीत. त्याचा कारखान्याच्या ऊस ऊसतोडणीवर परिणाम होत आहे. केंद्र सरकारने देशात प्रमाणा पेक्षा जास्त इथेनॉल निर्मितीचे उत्पादन झाल्याने बंधने घातली. त्यामुळे कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पातून फक्त १२ टक्केच उत्पादन झाले. त्यामुळे केंद्राच्या आदेशाने डिस्टलरी प्रकल्प बंद ठेवावा लागला. त्यामुळे कारखान्याचे ४ कोटी ३९ लाख रुपयाचे नुकसान झाले.
सभासदांनी पुढच्या वर्षी १८ लाख गाळप करण्यासाठी ऊस पुरवावा बाहेरील कारखान्यापेक्षाही आपण अधिक ऊस भाव देऊ असे आश्वासनही नागवडे यांनी दिले. बापूंनी ज्या पद्धतीने सहकार चालवला वाढवला त्याच पद्धतीने कारखान्याचे संचालक मंडळ काम करत आहे. ही सहकाराची कामधेनु टिकवण्यासाठी ऊस उत्पादक व सभासदांनी आपल्याच कारखान्यालाच द्यावा सभासदांच्या ही विश्वासाला संचालक मंडळ तडा जाऊ देणार नाही. चालू वर्षी सभासदांना दीपावलीसाठी चांगल्या प्रतीची साखर देऊ असे आश्वासन देत नागवडे म्हणाले की चालू वर्षाची दीपावली ऊस उत्पादक सभासदांना गोड करणार असल्याचे आश्वासनही नागवडे यांनी यावेळी जाहीर केले.
याप्रसंगी युवक कार्यकर्ते किरण नागवडे आपल्या मनोगता मध्ये म्हणाले की सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापूंनी या दुष्काळी तालुक्यात मोठ्या संघर्षातूनही सहकार चळवळ उभी केली. त्यामुळे शेतकरी कष्टकरी व सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले आहे. या संस्थेला जवळपास ५९ वर्ष झाले. बापूंच्या नंतर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी ही संस्था ताठ मानेने चालवली. राज्यात नागवडे कारखान्याचा नावलौकिक आहे. त्यामुळे या सहकारी संस्थेत कोणीही राजकारण आणू नये अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब इथापे, केशवराव मगर,काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी सभासद व कारखान्याच्या हितासाठी आपल्या मनोगता मध्ये काही मौलिक सूचना व्यक्त केल्या.
सभेसाठी कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर, पोपटराव ठाणगे, ऋषिकेश भोईटे, श्रीपाद खिस्ती, त्रिंबक मुठाळ, सोन्याबापु कुरुमकर, हरिचंद्र धांडे, राजेंद्र भोस, संग्राम पवार, सुनील जंगले, शहाजी गायकवाड, शिवदास जाधव, नाना कणसे, किरण नागवडे, सुनील जाधव, रामभाऊ रायकर सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. कार्यक्रम स्थळी मंचकावर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, राज्य बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा,राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, काँग्रेस नेते घनश्याम शेलार, दीपक शेठ नागवडे, बाबासाहेब इथापे, केशवराव मगर, अरुणराव पाचपुते, जिजाबापू शिंदे, हरिदास शिर्के, प्रेमराज भोईटे, टिळक भोस, धनसिंग भोईटे पाटील, प्रमोद शिंदे, संदीप नागवडे, लक्ष्मणराव नलगे, माणिकराव पाचपुते आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सुभाषराव शिंदे यांनी केले तर आभार संचालक भाऊसाहेब नेटके यांनी मानले.