लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. १० सप्टेंबर २०२४ :
तालुक्यामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून नवीन व दुबार रेशनकार्डबाबत अनेक अडचणी येत आहेत. अनेकांचे रेशनकार्ड ऑनलाईन नसल्यामुळे शासनाच्या विविध योजनांपासून विनाकारण वंचित राहावे लागत आहे. पुरवठा विभागातून अधिक माहिती घेतली असता रेशनकार्डबाबतचे अर्ज ऑनलाईन करण्याबाबत श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील सेतू आणि CSC केंद्र, कॉम्पुटर कॅफे चालक उदासीन आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना शासकीय लाभ मिळत नाहीत.
दरम्यानच्या काळात पुरवठा विभागातील निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई करून पुरवठा विभाग सुरळीत करण्यात आला होता. मात्र आता सेतू आणि CSC केंद्र चालक तसेच काही कॉम्पुटर कॅफे चालक ऑनलाईन रेशनकार्ड अर्ज न स्विकारता नागरिकांशी अरेरावीची आणि अर्वाच्च भाषा वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील सेतू आणि CSC केंद्र व कॉम्पुटर कॅफे चालकांनी ऑनलाईन रेशनकार्ड अर्ज स्विकारण्याबाबत योग्य त्या सूचना द्याव्यात. तसेच जे आपण दिलेल्या सूचनांचे पालन करत नाहीत तसेच नागरिकांशी गैरवर्तन करणाऱ्या सेतू आणि CSC केंद्र चालकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी अजिनाथ मोतेकर, राजेंद्र राऊत, नवनाथ माने यांनी नायब तहसिलदार अमोल बन यांना निवेदनाद्वारे केली आहे.