लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २१ सप्टेंबर २०२४ :
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये अनेकजण इच्छुक आहेत. याच दरम्यान माजी आमदार राहुल जगताप यांनी आज बारामती,माळेगावमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज शरद सभागृह येथे शेकडो कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ घेऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची भेट घेतली यावेळी उमेदवारी बाबत मनात शंका ठेवू नका कामाला लागा असं सांगितल्याने राहुल जगताप यांची राष्ट्रवादी पवार गटाकडून उमेदवारी निश्चित मानली जाते.
येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. अहमदनगर जिल्ह्यातही असंच वातावरण पाहायला मिळत आहे.महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून येत्या निवडणुकांच्या अनुषंगाने जय्यत तयारी सुरू आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात देखील आता राजकीय नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
श्रीगोंदा मतदारसंघात राहुल जगताप हेच उमेदवार असतील. त्यांना कामाला लागा असे सांगत नगर जिल्ह्यातील आठ जागा राष्ट्रवादी लढणार असून त्यात श्रीगोंद्याची जागा ही राष्ट्रवादीचीच असल्याचे घोषित केले असल्याचा दावा शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी शरद पवार यांनी राहुल जगताप यांना कामाला लागा अस सांगत आता तालुक्यातील प्रश्न आमदार होऊनच सोडवा असेही त्यांनी सांगितल्याचा दावा शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी केला आहे.
विधानसभेच्या मागील २०१९ च्या निवडणूकीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघा मध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अटीतटीची लढत झाली होती त्यात राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम प्रतापराव शेलार यांना ४,७५० मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते त्यावेळी विजयी झाले होते. त्यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे मानले जाते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी बाबत राहुल जगताप यांना हिरवा कंदील मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
चौकट
शिवसेनेच्या एका नेत्याने श्रीगोंदा मध्ये शिवसेनेच्या उमेदवारीची घोषना केली होती. मात्र महाविकास आघाडीतील तीन पक्ष मिळवू उमेदवार ठरवणार असल्याने शिवसेनेने एकट्याने उमेदवारी घोषित करणे बरोबर नाही असे ही शरद पवार यांनी सांगितले असल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले.