लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २२ सप्टेंबर २०२४ :
बहुजन पददलीत समाजापर्यंत भगीरथ प्रयत्नाने शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणाऱ्या थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३७ वा कर्मवीर जयंती मिरवणूक सोहळा संपन्न झाला. यामध्ये महादजी शिंदे विद्यालय, श्रीमंत राजमाता कन्या विद्यालय, महादजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी,शिक्षक, पालकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या भव्य दिव्य मिरवणुकाची सुरुवात महादजी शिंदे विद्यालयाच्या प्रांगणातून कर्मवीरांना यांच्या अर्ध पुतळ्याचे पूजन करून झाली. यामध्ये सर्व शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, सखी सावित्री समिती, परिवहन समिती, माजी विद्यार्थी संघ यांचे अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
मिरवणुकीमध्ये सर्व संकुलातील लेझीम पथक, झांज पथक, धाडसी मानवी मनोरे, वारकरी दिंडी पथक, ढोल ताशा पथक, स्काऊट पथक, विविध महापुरुषांच्या क्रांतिकारकांची वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी, एनसीसी पथक, एनएसएस पथक सर्वांचे आकर्षण ठरले.
शहरातील काळकाई चौक, शनी चौक, बगाडे कॉर्नर, झेंडा चौक, रोकडोबा चौक अशा विविध चौकाचौकात वारकरी दिंडी, झांज पथक,लेझीम पथक, मानवी मनोरे यांची आकर्षक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. उपस्थित सर्व नागरिकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मिरवणुकीमध्येही चौकात चौकात रस्त्या रस्त्यावर मान्यवरांच्या हस्ते अण्णांची पूजन झाले. एन. एस .एस.पथकाने विविध ठिकाणी पथनाट्य सादर केली. अतिशय सुंदररित्या ढोल ताशांच्या गजरात कर्मवीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक संपन्न झाली.