लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २३ सप्टेंबर २०२४ :
राज्यात थोड्याच दिवसात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यातच श्रीगोंदा मतदारसंघामध्ये आघाडीकडून उमेदवारीच्या तिकिटासाठी वातावरण चांगले तापले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते साजन पाचपुते यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की पक्षाकडून संधी मिळाल्यास मीच श्रीगोंदा मतदारसंघातून आमदारकी लढवणार आहे तसेच आपली आमदारकीची उमेदवारी निश्चित असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
त्यांनी आपला पक्ष आणि वरिष्ठ नेत्यांबद्दल निष्ठा व्यक्त करत सांगितले की, पक्षाचे धोरण पाळून व नेत्यांच्या निर्णयानुसारच काम करणार आहे. एम.आय.डी.सी.चा प्रलंबित प्रश्नांवरही पाचपुते यांनी लक्ष वेधले असून, ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एम.आय.डी.सी.चा प्रश्न सोडवून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. तरुणांची त्यांच्या कडून मोठी अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले.
श्रीगोंदा मतदारसंघातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी, विशेषतः तरुणांच्या रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे साजन पाचपुते यांनी यावेळी सांगितले. त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म पाळत आणि पक्षाच्या निर्णयानुसार काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.