दोन्ही आघाडयात अनेक दावेदर! तिकिटासाठी नेत्यांचा वेट अँड वॉच? कार्यकर्ते संभ्रमावस्थेत!
किशोर रा. मचे
श्रीगोंदा, ता. २३ : श्रीगोंदा मतदारसंघांमध्ये अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीची तयारी करताना दिसत आहेत महायुती व महाविकास आघाडी कडून उमेदवारीचे तिकीट मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र मतदार संघामध्ये आहे शक्ती प्रदर्शन आणि उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारी करताना प्रत्येक पक्षातील नेते दिसत आहेत. परंतु कुठल्याच आघाडीने उमेदवारी साठी नेत्यांच्या नावाची अधिकृत घोषणा न केल्याने तिकिटासाठी नेते वेट अँड वॉच च्या भूमिकेत दिसत आहेत.
महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे परंतु त्यांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे भाजपयु मोर्चा उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते किंवा प्रतिभाताई पाचपुते यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या राष्ट्रवादी जिल्हा महिला अध्यक्षा अनुराधाताई नागवडे सुद्धा महायुती कडून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारी करत आहेत त्यांनी काही दिवसांपासून मोठमोठ्या मेळाव्यांचे आयोजन करून शक्तिप्रदर्शनही केले आहे.जर महायुतीचे तिकीट भाजपला गेले तर त्यांची मोठी अडचण होणार आहे. भाजपकडून सुवर्णाताई पाचपुते यांनीही काही दिवसांपासून मतदार संघात दौरे करून मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्यामुळे त्याही उमेदवारीसाठी दावेदारी करू शकतात.
महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांमध्ये ही पक्षाच्या तिकिटासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे दोन दिवसांपूर्वी मविआ चा घटक पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे इच्छुक उमेदवार माजी आ.राहुल जगताप यांनी कार्यकर्त्यांसह बारामती मध्ये खा.शरद पवार यांची भेट घेतली त्यावेळी उमेदवारीचे संकेत देत कामाला लागण्याचे आदेश पवार यांनी दिल्याची माहिती जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितली. त्यामुळे राहुल जगताप यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
मविआ चा दुसरा घटक पक्ष शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत श्रीगोंद्यात झालेल्या एका कार्यक्रमा वेळी खा. संजय राऊत यांनी शिवसेनेचे उमेदवार साजन पाचपुतेच असतील असं सांगितलं होते तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दहीहंडी कार्यक्रमात येत्या विधानसभा निवडणुकीत साजन पाचपुते यांच्या रूपात राजकीय दहीहंडी फोडून श्रीगोंद्यात मशाल पेटवू त्यासाठी सर्वजण तयारीला लागा असे जाहीर आवाहन करत उमेदवारीचे संकेत दिले होते. त्यामुळे साजन पाचपुते उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार ठरू शकतात.
महाविकास आघाडी मधील काँग्रेस पक्षाचे नेते घन:शाम शेलार हे २०१९ च्या निवडणुकीत अवघ्या काही मतांच्या फरकाने पराभूत झाले होते त्यानंतर मागील साडेचार वर्षात त्यांनी जनसंपर्क कायम ठेवत सध्या त्यांची उमेदवारीसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या ते सतत संपर्कात आहेत त्यामुळे मविआ कडून उमेदवारीसाठी ते दावेदार मानले जात आहेत. तसेच जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार हे सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे त्यांनी एका कार्यक्रमात जाहीर केले होते सर्वच पक्षांसोबत तिकिटासाठी आपली चर्चा चालू असल्याचे ते बोलले होते त्यामुळे ते सुद्धा विधानसभा उमेदवारीसाठी दावेदारी करत आहेत.
राज्यत विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना श्रीगोंदा मतदारसंघात मात्र कुठल्याच आघाडीने उमेदवार निश्चित केले नसल्याने उमेदवारीसाठी नेत्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे दोन्ही आघाडीतील नेते तसेच इच्छुक उमेदवार वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत त्यामुळे कार्यकर्ते कोणता झेंडा घेऊ हाती म्हणत संभ्रमावस्थेत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.