शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीची स्थापना
श्रीगोंदा, ता. १३ : ऐतिहासिक श्रीगोंदा शहराची ओळख येथील उभ्या असलेल्या पुरातन वास्तूंनी आजही अधोरेखित होत आहे, महाराष्ट्रातील गडकिल्ले, बारव संवर्धन आणि पुरातन वारसा जतन करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेच्या माध्यमातून दसरा सणाच्या शुभमुहुर्तावर श्रीगोंदा शहराची ऐतिहासिक व पुरातन ओळख असलेल्या दिल्ली वेशीच्या संवर्धनाचे काम अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या नियोजनात हाती घेण्यात आले.
श्रीगोंदा येथील दिल्ली वेस स्वच्छता साहित्य पूजन करण्यात आले. त्यांनतर पूर्व बुरुज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
पश्चिमबुरुजांवर मागील आठवड्यात स्वच्छता मोहीम राबवून श्वास मोकळा केला होता.वेशीवर वर्षानुवर्ष दुर्लक्षित असलेले काटेरी गवत, खुरटे गवत वेली, झुडपे साफ सफाई करण्यात आली. त्यांनतर वेशीवर नवीन भगवा ध्वज फडकवला. वेस जतन करण्यासाठी यापुढेही वारंवार संवर्धन मोहिम राबविण्यात येणार आहेत. अशी माहिती टीम प्रमुख सागर शिंदे यांनी सांगितले.
या ऐतिहासिक मोहिमेत मारूती वागसकर, भरत खोमणे, तुषार चौधरी,सागर शिंदे, अमोल बडे, गोरख कडूस, दिगंबर भुजबळ, सचिन भोसले,ईश्वर कोठारे,अक्षय ओहळ,प्रणव गलांडे, जालिंदर पाडळे, नितिन शेळके, अमोल हिंगणे, महेश क्षीरसागर, नीरज पाडळे,आविष्कार इंगळे, शुभम हरिहर, यांसह अनेकांनीं सहभाग नोंदवला.
दिल्ली वेस संवर्धनासाठी शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीची स्थापना-
श्रीगोंद्याचा वैभवशाली ऐतिहासिक वारसा म्हणजे ही दिल्ली वेस आहे. श्रीगोंद्याची शान, अभिमान असणारी वेस. देशरक्षणासाठी पानिपतावर बलिदान देणाऱ्या तरण्याबांड पूर्वजांच्या इतिहासाची साक्षीदार आहे. दिल्ली जिंकण्यासाठी गेलेल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभी आहे.आजपर्यंत अपशकुनी वेस म्हणून कोणीही फारसे लक्ष दिले नाही. कुणीही हा वारसा जतन करण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. म्हणूनच दिल्ली वेस व श्रीगोंदा शहर तसेच तालुक्यातील पुरातन व वैभवशाली ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेच्या माध्यमातून वारसा संवर्धन समितीची स्थापना करण्यात येत आहे. स्थानिक नागरिक, लोकसहभागातून वेस संवर्धित केली जाईल अशी घोषणा उपस्थीत नागरिकांच्या वतीने शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी केली.