आदर्श आचारसंहिते बाबत २२६ श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली
श्रीगोंदा, ता. १५ : मा.भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दि.१५ ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची घोषणा केलेली असुन या तारखेपासुन निवडणुकीची आचारसंहिता संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात लागु झालेली आहे. अशी माहिती २२६ श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत यांनी विधानसभा आचारसंहिता निवडणुकीच्या अनुषंगाने तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे आयोजित पत्रकार बैठकी मध्ये दिली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे वेळापत्रक पुढील प्रमाणे
•अधिसूचना जारी करणे २२ ऑक्टोबर २०२४
•नामनिर्देशात भरण्याचा अंतिम दिनांक २९ ऑक्टोबर २०२४
•नामनिर्देशन पत्राची छाननी ३० ऑक्टोबर २०२४
•उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक ४ नोव्हेंबर २०२४
•मतदानाचा दिवस २० नोव्हेंबर २०२४
•मतमोजणीचा दिनांक २३ नोव्हेंबर २०२४
•ज्या दिनांका अगोदर निवडणूक प्रक्रिया संपविणे आहे तो दिनांक २५ नोव्हेंबर २०२४
विधानसभा निवडणुकीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम १० हजार रुपये व अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम ५ हजार रुपये इतकी असेल तसेच उमेदवारांना निवडणुकीसाठी करावयाचा खर्चाची मर्यादा ४० लाख इतकी राहील.
आचारसंहिते बाबत सूचना
दि महाराष्ट्र प्रिव्हेशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट १९९५ व मा. भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश व निर्देश यानुसार विनापरवाना खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणूक चिन्ह लिहिणे, कापडी बॅनर अथवा फलक लावणे, झेंडे लावणे व इतर कारणाने सदर मालमत्ता विद्रूपीत करणे वर बंदी घातलेली आहे.
अशाप्रकारे ज्या राजकीय पक्ष/ उमेदवाराने खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीत केली असेल त्यांनी अशी पोस्टर्स, भिंती पत्रके, घोषणा, झेंडे, कापडी फलक, व चिन्ह इत्यादी काढून टाकण्याची तातडीने व्यवस्था करावी. दि महाराष्ट्र प्रिव्हेशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट १९९५ अन्वये अशाप्रकारे मालमत्ता विद्रूपीत केल्यास तीन महिन्यापर्यंत तुरुंगवास अथवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षेस संबंधित इसम पात्र राहील. आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी जिल्ह्यात खालील प्रमाणे पथके कार्यान्वित करण्यात येणार आहेत 1.FST-6 2.SST-6 3.VST-3 4.VVT-1 याप्रमाणे सदर पथके 24X7 कार्यान्वित राहतील. तसेच तालुकास्तरावर 24X7 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे सदर नियंत्रण कक्षामध्ये 02487297002 हा दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित करण्यात येत आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी एकूण 345 मतदान केंद्रावर प्रत्येकी पाच कर्मचारी व एक पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र सुरू करण्यात आलेले असून, सदर केंद्रामध्ये 1950 हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे. सदर सुविधा नागरिकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कालावधीमध्ये 24X7 सुरू ठेवण्यात येणार असून नागरिकांनी सदर सेवेचा लाभ घ्यावा.
226 श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील सर्व राजकीय पक्ष, नागरिक, मतदार, प्रशासकीय यंत्रणा यांनी आवश्यक जबाबदारी पार पाडावी. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे व सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे निवडणूक निर्णय अधिकारी, 226 श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ यांचे तर्फे आवाहन करण्यात येत आहे निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष व निर्भय वातावरणात संपन्न करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.